११ महिन्यांत १,१०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:10 AM2019-12-19T07:10:50+5:302019-12-19T07:11:13+5:30
विदर्भातील सहा जिल्ह्यांची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, डोक्यावरील सावकारांचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात त्यामुळे येणारे अडथळे अशा असंख्य विवंचनांमुळे पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. आतापर्यंतच्या ११ महिन्यांत १,०५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आर्थिक संकटातून शेतकºयाला बाहेर आणण्यासाठी आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंत्यांत बहुतांश शेतकरी वंचित राहिले. त्या कर्जमाफीनंतरही विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या.
यंदा जानेवारीत ८५, फेब्रुवारीत ७८, मार्चमध्ये ९२, एप्रिलमध्ये ७८, मेमध्ये ९८, जूनमध्ये ९५, जुलैमध्ये १०५, आॅगस्टमध्ये ११४, सप्टेंबरात १०६ आॅक्टोबरात ८६, नोव्हेंबरात ९५ आणि १५ डिसेंबरपर्यंत ३५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या.
१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या
या सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. अमरावती व नागपूर विभागात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झाल्या आहेत.
जाचक निकषामुळे फक्त ७,६६७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र, तर
८,९५० प्रकरणे अपात्र ठरली. शिवाय
२९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित
आहेत. आतापर्यंत ७,६३२ शेतकºयांच्या वारसांना मिळाली.
२००५ पासून शासन मदतीत वाढ नाही
कर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५च्या आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे.
गेल्या १४ वर्षांत त्यात बदल झाला नाही, शिवाय ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व व्याज वाढते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार ठरून, त्याला कर्ज मिळत नाही आणि तो अन्य लाभांपासून वंचित राहतो.
सर्वाधिक आत्महत्या यवतमाळात
यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांनी शेतकरी आत्महत्या यंदा वाढल्या आहेत. यंदा सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही आत्महत्या (२५८) वाढल्या. अमरावती २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्ध्यात ७५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले.