शेगाव विकास आराखड्यासाठी मिळाले १११ कोटी
By admin | Published: July 7, 2014 10:27 PM2014-07-07T22:27:04+5:302014-07-07T22:27:04+5:30
शेगाव विकास आराखड्याला १११ कोटी रूपयांचा निधी अखेर मंजूर करण्यात आला.
शेगाव : संत गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी महोत्सवासाठी शासनाने घोषित केलेल्या शेगाव विकास आराखड्याला १११ कोटी रूपयांचा निधी अखेर मंजूर करण्यात आला. आज ७ जुलै रोजी मंत्रालयात शेगाव विकास आराखड्याच्या शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बुलडाण्याचे पालकमंत्री ना.हसन मुङ्म्रीफ, वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ.शिवाजी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास प्रधानसचिव श्रीकांत सिंह, मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. आ.डॉ.संजय कुटे, अमरावती विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड, नियोजन विभागाचे अधिकारी बक्षी, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, शेगाव विकास आराखड्याचे विशेष अधिकारी आंबेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी शेगाव विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पालकमंत्री ना.मुङ्म्रीफ यांनी आराखड्यासाठी १११ कोटी रूपये देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निधी तात्काळ मंजूर केला. या निधीमध्ये प्रभाग ४ मधील स्मशानभूमी तसेच मुस्लीम कब्रस्तान अशा दोन्हीकरीता ७ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कामाच्या विलंबामुळे वाढलेल्या किंमतीचा विचार करून या खर्चासही मुख्यमंत्र्यांनी मंजूरात दिल्याची माहिती आहे.
** मुख्यमंत्री चव्हाण टू चव्हाण
शिखर बैठकीचे चार वर्ष संत गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने शेगाव विकास आराखड्याची घोषणा करत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ३५0 कोटी रूपयांचा आराखडा घोषित केला. यानंतर २८ जानेवारी २0१0 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही बैठक पहिलीच बैठक होती. त्यानंतर गेल्या ४ वर्षात शिखर समितीची एकही बैठक झाली नाही. विशेष म्हणजे अशी बैठक घेण्यात यावी, याकरीता वारंवार निवेदने देण्यात आले. नागरिक हक्क संरक्षण समितीने आंदोलने केली. मात्र तरीही बैठक झाली नाही व अखेर आज ७ जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण ते आजचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असे वतरुळ या निमित्ताने पुर्ण झाले आहे. ज्याप्रमाणे निधी वाढवून दिला त्याच प्रमाणे आता मुख्यमंत्र्यांनी आराखड्याची कामे वेळेत पुर्ण व्हावी, याकरीता कठोर निर्देश देण्याची गरज आहे.
** स्कायवॉकसाठी १८ कोटी रूपये
शेगाव शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता भक्तांच्या सुविधेकरीता स्कायवॉक प्रस्तावित करण्यात आला आहे. हा स्कायवॉक गजानन महाराज मंदिराच्या दर्शन बारीपासून आनंदसागर पर्यंत जाणार आहे. या स्कायवॉकसाठी नव्याने मंजूर करण्यात आलेल्या १११ कोटीमधून १८ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. या स्कॉयवॉकच्या निर्मितीबाबत नागरिकांना विश्वासात घेवून जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी योग्य तो तोडगा काढल्यामुळे स्कॉयवॉकचा मार्ग मोकळा झाला आहे. हा स्कायवॉक बुलडाणा जिल्ह्यातील पहिला स्कायवॉक ठरणार आहे.
** नागझरी पर्यंतचा रस्ता
संत गजानन महाराज पालखीचा परिक्रमा मार्ग असलेल्या शेगाव-नागझरी या मार्गावरील तिनपुतळे म्हणून ओळखल्या जाणार्या चौकापासून थेट नागझरी पर्यंतचे ५00 मिटर रस्ताकाम या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. शेगावमध्ये अकोला मार्गावरून येणारे पादचारी तसेच लहानमोठी वाहने नागझरी मार्गेच येतात. त्यामुळे या रस्त्याची निर्मिती करणे आवश्यक होते. या रस्त्यासाठी ५0 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून भाविकांसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे.
** जुन्या वस्तीत ३२ ऐवजी ३0 फूट रुंदीचे रस्ते होणार
श्रींच्या पालखीचा परिक्रमा मार्ग असलेल्या जुन्या वस्तीतील रस्ते हे ३२ फूट रुंदीचे प्रस्तावित केले होते त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता व विकासकामे रखडली होती. हे रस्ते आता २ फुटाने कमी रुंदीचे केले जाणार आहे. त्यामुळे भू-संपादनाची रक्कमही वाचेल व नागरिकांचा रोषही कमी होईल. शेगाव ते गौलखेड या रस्ता कामासाठी २ कोटीची तरतूद याच निधीमध्ये करण्यात आली आहे.