११४ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू
By admin | Published: March 4, 2017 03:01 AM2017-03-04T03:01:27+5:302017-03-04T03:01:27+5:30
नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय घेतला
जयंत धुळप,
अलिबाग- केंद्र शासनाच्या ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय घेतला असून, ही योजना राबविण्याकरिता केंद्र, राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या एनओएफएन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ८२५ ग्रामपंचायती हायटेक करण्याचे काम रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. ११४ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात रायगड बीएसएनएलने आघाडी घेतली असल्याची माहिती रायगड बीएसएनएलचे उप महाव्यवस्थापक सी.व्ही.राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
राज्य शासनाने राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायती संगणकीकृत करून ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत यासारखे कार्यक्र म राबविणे सुरू केले आहे. सर्व जिल्हापरिषदा व पंचायत समित्याही संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून इंटनरेटद्वारे जोडल्या गेल्या आहेत. सुमारे २० हजार गावांत ई-बँकिंगचीही सुविधा उपलब्ध केली जात असून अशी सेवा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास व अन्य रस्ते विकास कामांच्या वेळी मुख्य आॅप्टिकल फायबर केबल (ओएफसी) वारंवार तुटण्याच्या प्रकारामुळे बीएसएनएलला यासाठी अनेकदा व्यत्यय येत असतो. ही समस्या दूर करण्याकरिता जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या सहयोगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. या सेवेमुळे ग्रामस्थांना विविध सेवा-सुविधा, विविध १९ प्रकारचे दाखले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेतमालाचे बाजारभाव, शासनाच्या योजना, हवामानाचे अंदाज हे घरबसल्या अत्यल्प वेळात स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
>समस्यांवर मात करून कनेक्टिव्हिटी
ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्राप्त या ११४ ग्रामपंचायतींमध्ये खालापूर तालुक्यातील ४२ पैकी २९, म्हसळा तालुक्यातील ४० पैकी २९, मुरुडमधील २४ पैकी २१, श्रीवर्धनमधील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील एकू ण ८२५ ग्रामपंचायतींपैकी ६८८ ग्रामपंचायतींकरिता ओएफसी केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे तर ३९५ ग्रामपंचायतींना ओएफसी कनेक्टिव्हिटी येत्या काही दिवसांत देण्यात येवू शकणार आहे. ग्रामपंचायतींकरिता बीएसएनएलचे किफायतशीर इंटरनेट प्लॅन देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.