कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 07:46 AM2020-09-22T07:46:22+5:302020-09-22T07:46:31+5:30

परदेशी, मुंढेंची बदली ठरली लक्षवेधी : एकाच अधिकाऱ्याच्या तीन-तीन बदल्या

117 IAS transfers in 165 days during Corona period | कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

googlenewsNext

यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कोरोनाच्या महामारीतही सपाटा लावल्याची आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या १६५ दिवसांमध्ये आयएएसच्या तब्बल ११७ बदल्या करण्यात आल्या.


७ एप्रिलपासून बदल्यांचा धडाका सुरू झाला. १८ सप्टेंबरपर्यंत तो सुरू होता. यात एका अधिकाºयाची दोन किंवा तीन वेळा बदली झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आदी अधिकाºयांच्या बदल्या लक्षवेधी ठरल्या.


लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांना सुरुवातीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली होती. नंतर ती उठवून केवळ १५ टक्के बदल्यांना अनुमती देण्यात आली. बदल्यांचा आर्थिक भार येतो हे कारण दिले गेले. आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना कुठलीही स्थगिती नव्हती हे खरे असले तरी, कोरोनाच्या संकटकाळात त्या-त्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या आयएएस अधिकाºयांच्या इतक्या बदल्या कराव्यात का, असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. एवढ्या बदल्या केल्यानंतरही अजून जवळपास दीड डझन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सहा अधिकारी पोस्टिंग बदलण्यासाठी धडपडत आहेत.


तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेतून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग; मंत्रालय येथे बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली. आता ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विनिता वेद-सिंघल या फिल्मसिटीच्या संचालक होत्या, त्यांची बदली आधी आदिवासी विकास विभागाच्या सचिव तर तीनच महिन्यांत त्यांची बदली कामगार सचिव म्हणून करण्यात आली.


दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांची बदली आधी लातूर महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली, पण लगेच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली प्रशासक; सिडको औरंगाबाद या पदावर झाली. किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून केली गेली आणि दोनच दिवसांत ती रद्द करून त्यांना मदत व पुनर्वसन विभागातच कायम ठेवण्यात आले.
अनुपकुमार यादव यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून बदली करून त्यांना विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून २३ जुलैला पाठविले आणि १३ आॅगस्टला त्यांची बदली आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून झाली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून कुणाल खेमनार यांची बदली हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, पण तीनच दिवसांत त्यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले.पुण्यात महापालिका आयुक्तांसह काही अधिकारी बदलले गेले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेही सातत्याने बदल्या केल्या, पण या सरकारने त्यापुढे पाऊल टाकल्याचे दिसते.

मंत्र्यांना हवे मर्जीतील अधिकारी
मंत्र्यांना आपल्या मर्जीचे हवे असलेले अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अशी प्रशासनात दोन सत्तास्थाने असणे, तीन पक्षांचे सरकार असणे, क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाºयांची धडपड, एका शहरातील दोन वा तीन आयएएस अधिकाºयांमध्ये (जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी) विसंवाद असणे ही वारंवार बदल्यांची प्रमुख कारणे सांगितली जातात.

Web Title: 117 IAS transfers in 165 days during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.