राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:40 PM2024-09-06T12:40:23+5:302024-09-06T12:42:00+5:30
Mumbai News: मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई - मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमुळे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.
टॉवर सेमीकंडक्टर कंपनी व अदानी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प पनवेल येथे होऊ घातला आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात २५ हजार १८४ कोटी रुपये अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे १५ हजार बेकार हातांना रोजगार मिळणार आहे.
दोन महिन्यांत २ लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता : गेल्या दोन महिन्यांत झालेल्या बैठकांमध्ये एकूण २ लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
कुठे ईव्ही, तर कुठे ज्यूट
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पद्धतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून, प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटींची गुंतवणूक होणार असून, त्या माध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होईल.
रेमंड लक्झरी कॉटन्सचा स्पिनिंग, यार्न डाइंग, विव्हिंग ज्यूट, विव्हिंग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अमरावती येथील नांदगाव पेठ अतिरिक्त एमआयडीसीत होणार असून, यात १८८ कोटी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.