अकरावीच्या ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
By Admin | Published: July 29, 2016 08:09 PM2016-07-29T20:09:26+5:302016-07-29T20:09:26+5:30
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले होते
आॅनलाईन नोंदणीला आजपासून पुन्हा सुरूवात
मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले होते. त्यांपैकी एकूण ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी बुधवार व गुरूवार या दोन दिवसांत महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. तर अर्धवट नोंदणी अर्ज भरलेल्या
विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन नोंदणी अर्ज करण्यास शनिवारी, ३० जुलैपासून सुरूवात होत आहे.
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्धवट नोंदणी अर्ज भरलेले आणि अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारपासून आॅनलाईन नोंदणीला पुन्हा सुरूवात आहे. याआधी यशस्वीरित्या अर्ज भरलेल्या आणि महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत नोंदणी करता येणार नाही. केवळ नोंदणी अर्ज अर्धवट भरलेल्या आणि याआधी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या फेरीचा फायदा होणार आहे. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरून नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.
या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ४ आॅगस्टला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना ९ आॅगस्ट रोजी नव्याने नोंदणी करण्याची संधी आहे. दरम्यान, चारही गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार आणि गुरूवारी प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली होती. त्यासाठी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या ७० हजार विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना प्रशासनाने मेसेज पाठवत रिक्त जागेवर प्रवेशाची संधी दिली.
मात्र प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश घेता आला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी पार पडणाऱ्या पहिल्या विशेष फेरीत नव्याने नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
................................................
मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांतील अकरावीच्याय वर्गात आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी आत्तापर्यंत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या आहेत. तर नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवार व गुरूवारी पाचवी विशेष फेरी राबवण्यात आली. अशाप्रकारे पार पडलेल्या पाच फेऱ्यांमध्ये एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेले
आहेत.
...............................
मेसेज आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेल्या नॉट रिपोर्टेड
विद्यार्थ्यांची आकडेवारी -
बोर्ड विद्यार्थी
एसएससी ११,२५९
सीबीएसई २११
आयसीएसई २४८
आयबी ०
आयजीसीएसई ३१
एनआयओएस २२
इतर ५९
.................................................
एकूण ११,८३०