‘गँग्ज आॅफ डॉन्सच्या डोंबिवली’त ११९१ शस्त्रे

By admin | Published: June 5, 2017 03:12 AM2017-06-05T03:12:20+5:302017-06-05T03:12:20+5:30

सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरी असलेली डोंबिवली आता क्राइम सिटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे

1191 weapons of 'Gangs of Dons' in Dombivli | ‘गँग्ज आॅफ डॉन्सच्या डोंबिवली’त ११९१ शस्त्रे

‘गँग्ज आॅफ डॉन्सच्या डोंबिवली’त ११९१ शस्त्रे

Next

आकाश गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरी असलेली डोंबिवली आता क्राइम सिटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मे महिन्यात परवानाधारक पिस्तुलांमधून झालेल्या तीन गोळीबारांच्या घटनांमध्ये तिघांचा बळी गेला. त्यामुळे पोलिसांनी कल्याण परिमंडळात दिलेल्या एक हजार १९१ शस्त्र परवान्यांची चौकशी सुरू केली आहे. ठाकुर्लीतील किशोर चौधरी हत्याकांडातील आरोपी भोईर कुटुंबीय तसेच सागाव येथील म्हात्रे यांचा शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव स्थानिक पोलिसांनी ठाणे आयुक्तालयाकडे पाठवला आहे.
कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत कल्याण-डोंबिवली शहरे येतात. कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीचे भौगोलिक क्षेत्रफळ कमी आहे. डोंबिवली शहरातील राजकीय व्यक्ती, जमीनमालक, व्यावसायिक यांच्यासह चमकेशगिरी करणाऱ्या अनेकांनी स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत शस्त्रांसाठी परवाने मिळवले आहेत. डोंबिवलीत बांधकाम व्यवसाय अधिक तेजीत आहे. त्यामुळे स्थानिक जमीनमालक, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांच्यात जमिनीचे व्यवहार, आर्थिक देवाणघेवाणीवरू न संघर्ष होऊ लागल्याने डोंबिवलीत ६६८, तर कल्याणमध्ये ५२३ असे एकूण एक हजार १९१ शस्त्र परवाने दिले आहेत.
कल्याण - डोंबिवलीतील बांधकाम व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडांचे वधारलेले भाव, जमिनीच्या हिश्श्यांवरून निर्माण झालेली भाऊबंदकी, हिश्श्यांवरून कौटुंबिक वाद, याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांवर बांधकाम साहित्यखरेदीसाठी स्थानिक गुंडांकडून येणारा दबाव, हप्तेबाजी, राजकीय वैमनस्य यामुळे आणि उघडपणे शस्त्र बाळगण्याची चमकेशगिरी करण्याच्या हव्यासापोटी शस्त्र परवाने घेण्याकडे कल वाढू लागला आहे.
कल्याणपेक्षा कमी भौगोलिक क्षेत्रफळ असलेल्या डोंबिवली शहरात गेल्या काही वर्षांत बांधकाम व्यवसाय अधिक तेजीत आल्याने स्थानिक जमीनमालक, बांधकाम व्यावसायिक यांच्यातील जमिनीचे व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण यावरून त्यांच्यात वाद उत्पन्न होऊ लागले. त्यातून संघर्ष टोकाला गेल्याने विरोधकांकडून जीवाला निर्माण झालेली भीती यामुळे कल्याणपेक्षा डोंबिवलीतील शस्त्र परवानाधारकांची संख्या अधिक वाढली. हे शस्त्र परवाने घेण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक, अन्य व्यावसायिक व उद्योजक, राजकारणी यांचा भरणा आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली शहरांत सध्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या, लूटमार, विनयभंग, लॉटरी, मटक्याचे अड्डे, बेसुमार रेतीउपसा या घटना वाढल्याने कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
>कल्याण पोलिसांच्या हद्दीतील आकडेवारी
कल्याण विभागातील ४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५२३ जणांना शस्त्र परवाने देण्यात आले असून त्यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाणे १५९, खडकपाडा पोलीस ठाणे ९९, बाजारपेठ पोलीस ठाणे ८९ व कोळसेवाडी चौक पोलीस ठाणे १७६ अशी शस्त्र परवानाधारकांची संख्या आहे.
डोंबिवली विभागातील ४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ६६८ जणांना शस्त्र परवाने दिले असून त्यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे १६९, रामनगर पोलीस ठाणे १८८, विष्णूनगर पोलीस ठाणे २४१ व टिळकनगर पोलीस ठाणे ७० अशी शस्त्र परवानाधारक व्यक्तींची संख्या आहे.

Web Title: 1191 weapons of 'Gangs of Dons' in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.