"१२-१२ जागा घ्याव्यात म्हणजे आम्हाला १२ वाजवता येतील", रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:29 PM2024-01-05T16:29:12+5:302024-01-05T16:30:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला.
सांगली : राज्यात वंचितने १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, हा प्रस्ताव चांगला आहे, त्यामुळे चारही पक्षांनी १२-१२ जागा घ्याव्यात, म्हणजे आम्हाला त्यांचे १२ वाजवता येतील, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला. ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत, ते महायुतीसोबत येणार नाहीत. पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत, 12 जागांचा प्रकाश आंबेडकर यांचा मविआला प्रस्ताव आहे. त्या जागा त्यांना द्यावात म्हणजे आम्हाला त्याचे बारा वाजवणे सोपे जाईल. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे, त्यांनी त्याचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
मराठा समाजातील गरीब घटकाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकाचा यासाठी विचार व्हावा. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सरकार त्यावर सध्या कामही करत आहे. हे आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून न घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण दिल्यासही तोडगा मिळू शकतो, असे रामदास आठवले म्हणाले.
याचबरोबर, सध्या सुरू असलेला ओबीसी-मराठा वादही मिटणे आवश्यक आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातीलही मतभेद मिटवले, तर आरक्षणाच्या मागणीवर सरकारला काम करता येणार आहे. २० जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, ती वेळ येणार नाही. त्या अगोदरच शासन यावर निर्णय घेईल. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणासाठी स्वतंत्र १५ टक्क्यांचे आरक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
शरद पवार यांना अजित पवार यांनी निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून रामदास आठवले यांनी भाष्य केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील, असे वाटत नाही. तसेच, अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे, असे रामदास आठवले म्हणाले. याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रमध्येच गरज असून दिल्लीत फडणवीस यांनी येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. शिर्डीमधून निवडणूक लढवू इच्छित असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.