Maharashtra Lockdown: "राज्यात १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, पण परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये", हसन मुश्रीफांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:50 PM2021-04-13T13:50:51+5:302021-04-13T13:51:16+5:30
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यात आता राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी १२ ते १३ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. (12 to 13 days lockdown may imposed in maharashtra migrant labours should stay in maharashtra says hasan mushrif)
राज्यातील लॉकडाऊनची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी केली जाईल, असंही सांगण्यात येत आहे. अद्याप याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
हसन मुश्रीफ यांनी यावेळी राज्यातील परप्रांतीय कामगारांना गावी न जाण्याचं आवाहन केलं आहे. "राज्यात लॉकडाऊन जरी जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये", असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार- अस्लम शेख
राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच मोठा निर्णय घेणार असून, त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे विधान मुंबईचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.
लॉकडाऊनबाबत माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.