लोणावळ्यात 12 दिवसात बाराशे मिमी पाऊस; शहरात जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 03:12 PM2018-07-15T15:12:37+5:302018-07-15T15:12:51+5:30
पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे.
लोणावळा : पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. मागील दीड आठवड्यापासून परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने वलवण, शिरोता, पवना, आंद्रा, वाडिवळे ही मावलक तालुक्यासह पिंपरी चिंचवड परिसराला पाणी पुरवठा करणारी धरणे पंन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आहे. लोणावळा धरणातून देखील खोपोली विज निर्मीती केंद्राला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
जूनच्या संपूर्ण महिन्यात केवळ 737 मिमी (29 इंच) असलेला पाऊस पंधरा दिवसात 2106 मिमीवर (83 इंच) गेला आहे. शहरात दररोज सरासरी चार इंच पाऊस होत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. वाकसई, कार्ला, वेहेरगाव परिसरात नव्याने होती असलेली बांधकामे व रस्त्याच्या लगत करण्यात आलेले भराव यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने भातशेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
या संततधार कोसळणार्या पावसात देखिल वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता शनिवार व रविवारच्या सुट्टी निमित्त हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने सर्वत्र मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा नाका परिसरात चालणे देखिल मुश्किल होत आहे, हीच परिस्थिती भुशी गाव ते भुशी धरण परिसरात आहे. वाहतुक कोंडी सोडविण्याकरिता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून धरणाकडून येणारी वाहने रायवुड मार्गे जुनाखंडाळा येथे बाहेर काढण्यात आली आहेत.