रायसोनी पतसंस्थेच्या १२ संचालकांना अटक
By Admin | Published: September 10, 2015 02:24 AM2015-09-10T02:24:04+5:302015-09-10T02:24:04+5:30
बारामतीतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १२ संचालकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली.
बारामती : बारामतीतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १२ संचालकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली. जळगाव येथे मुख्यालय असलेल्या या पतसंस्थेच्या संचालकांवर फसवणूक प्रकरणी राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत २१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. ए. खान यांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन १२ जणांना ताब्यात घेतले. प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५४), दिलीप कांतिलाल चोरडिया (५२) सूरजमल भुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भगवत संपत माळी (६६), मोतीलाल ओंकार कोळी (४७), भगवान हिरामन वाघ (६०), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२), इंद्रकुमार आत्माराम लालवानी (४०), यशवंत ओकार जिरी (६०), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५७) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. पोलिसांनी ‘बीएचआर’च्या स्थानिक सल्लागार मंडळावरदेखील गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केलेली नाही, असे खान यांनी सांगितले. या प्रकरणातील फिर्यादीसह अन्य ठेवीदारांच्या २७ कोटी २० लाख ९० हजार ५१ रुपयांची फसवणूक झाली आहे. ठेवीची व्याजासह परत करण्याची रक्कम ३५ कोटी २५ लाख ६ हजार ४२५ रुपये आहे.