‘शेतीसाठी मिळणार दिवसा १२ तास अखंड वीज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 02:18 AM2017-04-17T02:18:46+5:302017-04-17T02:18:46+5:30
शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्र मात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली.
मुंबई : शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्र मात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित या कार्यक्रमाचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवारी प्रसारित झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदाने थेट जमा करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला होता आणि कर्जमाफीच्या मुद्यावर सविस्तरपणे शासनाची भूमिका मांडली होती.
सौर ऊर्जा व पडीक शेतजमीनीसंदर्भात उमाकांत जोशी व स्वामी विशे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी देत असून राज्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरूज्जीवन करून कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सातारा येथील राजेंद्र गायकवाड यांनी हळद पीक संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हळद प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंतची योजना आहे.
एसएमएसद्वारे नाशिकच्या सदाशिव पांगरे यांनी हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होत असलेल्या परिणामाचा कसा मुकाबला करणार याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश वातावरणातील बदलाचा मुकाबला करणारी शेती तयार करणे असा आहे. (विशेष प्रतिनिधी)