‘एक्स्प्रेस वे’वर १२ किमीचा उन्नत मार्ग
By admin | Published: September 25, 2016 12:48 AM2016-09-25T00:48:20+5:302016-09-25T00:48:20+5:30
मुंबई-पुणे या दोन शहरांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुळे झपाट्याने विकास झाला. यामुळे येथील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली. आताच त्यावर एखादा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात
- नारायण जाधव, ठाणे
मुंबई-पुणे या दोन शहरांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मुळे झपाट्याने विकास झाला. यामुळे येथील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली. आताच त्यावर एखादा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून रस्ते विकास महामंडळाने खोपोली एक्झिट ते कुसगाव रस्ता अर्थात सिंहगड संस्थेदरम्यान १२ किमी लांबीचे दोन बोगदे असलेल्या आठपदरी नवीन रस्त्यासह खालापूर येथील फूड मॉल ते खोपोली इंटरचेंज असा आठपदरी उन्नतमार्गाचे नियोजन केले असून त्यासाठीच्या सुमारे ३ हजार २१५ कोटींच्या खर्चास राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिल्याने निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भविष्यात या परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहरासह रस्ते विकास महामंडळ स्वत:ही त्याच्या दोन्ही बाजंूच्या दोन किमी परिसराचा विकास करणार आहे. याशिवाय, सिडकोचा एसईझेड प्रकल्प, जेएनपीटीच्या विस्तारास सुरुवात झाली आहे. हे प्रकल्प आणि नवीन शहरे पाहता या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. या दोन्ही कामांसाठी लागणारा निधी रस्ते विकास महामंडळाने उभारावयाचा असून आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा मागवून त्यांचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी महामंडळाने विश्लेषणात्मक आर्थिक फायद्याचा विचार करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे. राज्य शासनाने या ३२१५ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देताना रस्ते विकास महामंडळास या मार्गासाठी दिलेला सवलत कालावधी ३० एप्रिल २०३० ऐवजी आता ३१ जुलै २०३५ पर्यंत वाढवून दिला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या क्षमतेत वाढ करण्यासाठीच्या ३२१५ कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळ पायाभूत समितीने ३० नोव्हेंबर २०१५ रोजीच मान्यता दिली आहे. मात्र, त्याचा शासन निर्णय निघालेला नव्हता. मंगळवारी ती प्रक्रियाही पूर्ण झाल्याने येत्या आठ दिवसांत या दोन्ही कामांच्या तांत्रिक आणि आर्थिक निविदांच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात येईल. त्यानंतरच बांधकामाच्या निविदा काढून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल.
- राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ