द्रुतगती मार्गावर १२ किमीचा बोगदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 04:09 AM2016-07-22T04:09:33+5:302016-07-22T06:32:02+5:30

अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएम सिस्टिम) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

A 12 km tunnel on the fastest way | द्रुतगती मार्गावर १२ किमीचा बोगदा

द्रुतगती मार्गावर १२ किमीचा बोगदा

Next


मुंबई : मुंबई-पुणे दु्तगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएम सिस्टिम) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अपघात रोखण्यासाठी ब्रिफेन वायरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच खालापूर ते ‘सिंहगड’ असा १२ किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
एक्प्रेस वे वर होणारे अपघात आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात अजित पवार, सुभाष पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह तब्बल ४१ सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असल्याची टीकाही केली.
मंत्री शिंदे यांनी सांगितले की, दरडी कोसळण्याचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी एमएसआरडीसीने आयआयटीच्या सल्ल्यानुसार युद्धपातळीवर काम केले आहे. आयटीएम सिस्टिम उभारण्याचा निर्णय अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
या अंतर्गत कंट्रोल अँड कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याबाबत गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे. या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममध्ये स्पीड मॉनिटरिंग, लेन कटिंगवर नियंत्रण, आॅटोमॅटिक व्हेईकल नंबर डिटेक्शन, नाईट व्हिजन, चलान इत्यादी यंत्रणांचा समावेश असेल. (विशेष प्रतिनिधी)
>ट्रॉमा सेंटरला ‘सिद्धीविनायक’ची मदत
ओझर्डे येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर १६ जून रोजी एमएसआरडीसीच्या ताब्यात आले असून सिद्धीविनायक ट्रस्ट या केअर सेंटरसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरवणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेसह एमएसआरडीसीने झीरो फॅटेलिटी कॉरिडॉरच्या संदर्भात सामंजस्य करार केला असून या संस्थेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याची प्रक्रि याही सुरू करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वे च्या टोलनाक्यांवर वाहनचालकांना ताटकळावे लागू नये यासाठी सी लिंकच्या धर्तीवर इंटेल सिस्टिम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
>अशा असतील उपाययोजना
महामार्गावर सध्या १४ किमीच्या पट्टयात ब्रिफेन वायर बसवण्यात आल्या असून २५ किमीच्या पट्टयात ब्रिफेन वायर बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे उर्वरित पट्टयातदेखील ब्रिफेन वायर बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. गेल्या वर्षी पावसाळ्यात महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर एमएसआरडीसीने तातडीने हालचाली करून आयआयटी तसेच जिआॅलॉजिकल सर्व्हेआॅफ इंडियाच्या मदतीने अतिसंवेदनशील जागांवर युद्धपातळीवर हायटेन्साइल वायर रोप्सच्या सेफ्टी नेट्स, ८ ते १२ मीटर खोलीपर्यंत रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या आहेत. त्यानंतर आयआयटी मार्फत पुन्हा सर्वेक्षण करून त्यांनी सुचवलेल्या नव्या जागांवर देखील लवकरच काम सुरू करण्यात येत आहे, असेही शिंदे म्हणाले.
।लेन कटिंगवर कठोर कारवाई
या महामार्गावर ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी नेहमीच्या पोलिसांबरोबरच डेल्टा फोर्सच्या १०० जणांचे कृती दल उभे केले जाणार असून त्यांना विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा दर्जा दिला जाईल. खालापूर ते ‘सिंहगड’ असा १२ किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

Web Title: A 12 km tunnel on the fastest way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.