प्रिसकॉन रिएल्टर्सविरुद्ध 12 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: August 12, 2016 09:54 PM2016-08-12T21:54:01+5:302016-08-12T21:54:01+5:30
प्रिसकॉन रिएल्टर्स अॅन्ड इन्फ्रास्ट्रर प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीमध्ये एका सदनिकेचे 12 लाख 85 हजार 247 रुपयांमध्ये बुकिंग करूनही त्यांना सदनिका देण्यात आली नाही
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 12 - अकोला येथील रहिवाशाने ठाण्यातील प्रिसकॉन रिएल्टर्स अॅन्ड इन्फ्रास्ट्रर प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीमध्ये एका सदनिकेचे 12 लाख 85 हजार 247 रुपयांमध्ये बुकिंग करूनही त्यांना सदनिका देण्यात आली नाही. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात या कंपनीसह तिचे संचालक विनय केडिया यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अॅक्ट (मोफा) कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
इंदोर येथे नोकरीला असलेल्या संतोष शर्मा यांनी ठाण्यात गुंतवणूक करण्यासाठी घोडबंदर रोडवरील प्रिसकॉन रिएल्टर्स च्या प्रेस्टिज रेसिडेन्सी, हिल व्यूह, या घोडबंदर रोडवरील इमारतीमध्ये 6 डिसेंबर 2012 रोजी एक सदनिका आरक्षित केली. सदनिका आरक्षित केल्यापासून त्यांना 550 दिवसांमध्ये इमारतीचे काम पूर्ण होईल, असेही प्रिसकॉनतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार या कंपनीने आरक्षित केलेल्या सदनिकेचे कोटेशनही दिले होते. कोटेशननुसार त्या सदनिकेची 12 लाख 85 हजार 247 ही 20 टक्के रक्कमही शर्मा यांनी भरली होती. ही रक्कम घेऊनही या कंपनीने किंवा तिच्या वतीने केडीया यांनी शर्मा यांच्यासोबत कोणताही करार किंवा नोंदणी केली नाही. या इमारतीच्या बांधकाम संदर्भातील वस्तुस्थिती लपवून, जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन शर्मा यांची दिशाभूल करण्यात आली. तसेच मोफा कायद्याचाही भंग केला. याप्रकरणी शर्मा यांनी नांदेड येथे गुन्हा दाखल केला. परंतु प्रेस्टीज रेसिडेंसी ही इमारत ठाण्याच्या घोडबंदर भागात असल्याने तसेच त्यांची फसवणूकही याच भागात झाली असल्याने हा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी वर्ग करण्यात आला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. टेळे यांनी सांगितले.