१२ अल्पवयीन गुन्हेगारांचे पलायन
By admin | Published: January 12, 2016 02:20 AM2016-01-12T02:20:25+5:302016-01-12T02:20:25+5:30
बारा अल्पवयीन गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून शहरातील बालसुधारगृहातून पलायन केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मानवी मनोरे रचून आणि चादरीने दोर बनवून या गुन्हेगारांनी
नाशिक : बारा अल्पवयीन गुन्हेगारांनी बराकीचे गज कापून शहरातील बालसुधारगृहातून पलायन केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मानवी मनोरे रचून आणि चादरीने दोर बनवून या गुन्हेगारांनी सुधारगृहाची २० फूट उंचीची दगडी भिंत ओलांडल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांनी हवालदार आणि शिपायाला तत्काळ निलंबित केले आहे.
दरम्यान, पलायन केलेल्या बालगुन्हेगारांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. यापैकी दोघांना पुण्यातील निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
बालन्यायालयाने शिक्षा सुनावलेले गंभीर गुन्ह्यातील राज्यभरातील २६ अल्पवयीन गुन्हेगार मेळा बसस्थानकासमोरील बालसुधारगृहात आहेत़ सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास यातील १२ गुन्हेगारांनी पलायन केले. यामध्ये पुणे येथील ९, सातारा येथील २, तर मुंबईतील एका अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे़ हे गुन्हेगार १७ ते १९ वर्षे वयोगटातील असून, त्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील ३, जबरी चोरीतील ३, जबरी लुटीतील १, तर चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेले ५ गुन्हेगार आहेत़
सोमवारी दुपारी पुणे येथील अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ़ भूषणकुमार उपाध्याय यांनी बालसुधारगृहास भेट देऊन घटनेची चौकशी केली़ तसेच रात्रपाळीतील कर्मचारी हवालदार राजेंद्र झाल्टे व शिपाई भास्कर भगत यांच्या निलंबनाचे आदेश दिले़