राष्ट्रवादीचे १२ नेते फुटीच्या मार्गावर?; शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:43 PM2022-11-04T16:43:58+5:302022-11-04T16:44:39+5:30
१५ वर्षाला आषाढीला कुणीही येण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस आषाढी, कार्तिकीची पूजा करतील असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
सोलापूर - राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीमागे उभे आहे. सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात चांगले काम करताना दिसतायेत. प्रत्येकाला निधी मिळतोय हे लोकांना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नेते फुटले आहेत, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. सोलापूर जिल्ह्यातीलही मोठा नेता त्यात आहे. सर्व ठरलंय, जरा थांबा असं म्हणत शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, सरकार पाडण्याची भाकीतं अनेकदा केली आहेत. ९५ साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी ५ वर्ष शरद पवार आम्हाला सांगायचे पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. परंतु मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार काही पडले नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आताही सरकार पडणार असं विधानं करून यांच्या पक्षातील नेते भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना यात येणार आहेत त्यांना अडवण्यासाठी भीती निर्माण करत आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत १५ वर्षाला आषाढीला कुणीही येण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस आषाढी, कार्तिकीची पूजा करतील. सुषमा अंधारे यांनी विधाने मतभेद करणारी आहेत. त्यांच्यावर फारसं बोलण्यासारखं नाही. उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून काम करता आले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये असंतोष पसरला. प्रत्येक आमदार, नेता स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार हे मोठे राजकारणी, ९५ साली कुठे गेले होते. त्यावेळी सरकार पडले नाही. शिवसेना-भाजपा मिळून १०० जागा नव्हत्या. आता १७० जागा आहेत. त्या पाडायला निघाल्यात. त्यांच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला दावा
जयंत पाटील जे बोलले असतील ते तर्कशुद्ध आणि अभ्यास करून बोलतात. आमच्या पक्षाबद्दल काही अफवा पसरवल्या जातात. तसला कुठलाही प्रकार नाही. आमचे सर्व एकत्र आहोत. घट्ट आहोत आणि एकजीवाने काम करतोय असं सांगत राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी शहाजीबापू पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"