पालिका बांधणार १२ नव्या शाळा, नियोजन आराखड्यातील तरतुदी रखडत असल्याने निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:30 AM2017-09-20T02:30:50+5:302017-09-20T02:30:52+5:30
विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे.
मुंबई : विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची गळती सुरू असताना, पालिकेने २८ हजार ४५२ चौरस मीटर आकाराच्या १२ नवीन शाळा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. या शाळांच्या बांधकामासाठी २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद २०१७-१८च्या अर्थसंकल्पात केली आहे.
महापालिकेचा प्रस्तावित ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर झालेला नाही. तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा-सुविधा निर्माण करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. विकास आराखडा २०३४ साठी पालिकेने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा चार पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच प्रत्येक पंचवार्षिक टप्पादेखील पुन्हा वार्षिक टप्प्यामध्ये विभागला आहे. याप्रमाणे, विकास नियोजन आराखड्यानुसार प्रत्येक वर्षी नवीन कामांसाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
१९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यातील शिक्षणाशी संबंधित आरक्षणे, जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत. या आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून, मोकळ्याही आहेत, तसेच या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.
त्यामुळे पालिका शाळांसाठी आरक्षित असलेले १० भूखंड, तर पालिकेच्या ताब्यात असलेले इतर दोन भूखंड अशा एकूण १२ भूखंडांवर शाळा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी
दिली.
शाळांची सद्य:स्थिती
सध्या महापालिकेच्या एक हजार ४८ प्राथमिक शाळा असून, त्यात दोन लाख ८७ हजार ९७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिकेच्या १४७ माध्यमिक शाळांमध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तर ४२२ अनुदानित शाळांमधून एक लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार, एकूण एक हजार ६१७ शाळांमधून चार लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६९३ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये तीन लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत.