१२ टक्के दरवाढीचेवृत्त तथ्यहिन
By admin | Published: March 30, 2017 03:23 AM2017-03-30T03:23:32+5:302017-03-30T03:23:32+5:30
राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही
मुंबई : राज्यात १२ टक्के वीज दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले. वीजबिल थकबाकी आहे म्हणून कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, निर्यातदार आणि मोठया बागायतदार शेतक-यांबाबत वेगळे विजेचे वेगळे धोरण आणण्याचा विचार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अत्यावश्यक होते. त्याचवेळी शासनाने जळगाव जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. वीजजोडण्यांसाठी पैसे भरलेल्या तेथील शेतकऱ्यांच्या प्रलंबित जोडण्या लवकरच दिल्या जातील. राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिलापोटी १७ हजार कोटी रुपयांची देणी थकित आहेत.