कटाचे धागे राज्यभरात, १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 05:37 AM2018-08-12T05:37:12+5:302018-08-12T05:37:45+5:30
सणांमध्ये घातपात घडविण्याचा कट दहशतवादविरोधी पथकाने उधळल्यानंतर त्याचे धागे राज्यात दूरवर असल्याचे पुढे आले आहे. एसटीएसने दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत राज्यातून आणखी १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत.
मुंबई - सणांमध्ये घातपात घडविण्याचा कट दहशतवादविरोधी पथकाने उधळल्यानंतर त्याचे धागे राज्यात दूरवर असल्याचे पुढे आले आहे. एसटीएसने दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत राज्यातून आणखी १२ हिंदुत्ववादी कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. शुक्रवारी अटक केलेल्या सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्याच्या घरातून एटीएसने १० गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त केला.
बकरी ईद व गणेशोत्सवात मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा येथील वर्दळीच्या ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट होता. त्यानुसार रेकी करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
नालासोपारा येथे सनातन संस्थेशी संबंधित वैभव राऊत याच्या घरातून एटीएसने २२ गावठी बॉम्बसह स्फोटकांचा साठा शुक्रवारी जप्त केला. राऊतसह शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसने अटक केली आहे. शनिवारी ताब्यात घेतलेले तरुण पुणे, सोलापूर, सातारा परिसरातील असून घातपाती कृत्ये करण्याच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय एटीएसला आहे.
जप्त केलेली स्फोटके ‘एफएसएल’कडे तपासणीसाठी पाठविली आहेत. त्याच्या अहवालानंतर स्फोटकांच्या साहित्याची तीव्रता स्पष्ट होईल, असे एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
वैभव राऊत कटाचा मुख्य सूत्रधार होता. त्याच्या संपर्कात असलेल्या
गोंधळेकर व कळसकर यांच्याकडूनही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे मोबाइल रेकॉर्ड्स तपासण्यात येत आहेत.
आणखी साहित्य जप्त
एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या शिवप्रतिष्ठान संस्थेशी संबंधित सुधन्वा गोंधळेकर याच्याकडील चौकशीनंतर शनिवारी आणखी हत्यारे व साहित्य जप्त केले.
जिवंत काडतुसांसह १० गावठी पिस्तुले, १ गावठी कट्टा, १ बंदूक, १० पिस्तुल बॅरल, प्रत्येकी ६ अर्धवट पिस्तुल बॉडी, काडतुसे, ३ मॅग्झिन, ७ पिस्तुल स्लाइड, १६ रिले स्विच, वाहनाच्या सहा नंबर प्लेट तसेच चॉपर आदी जप्त केले. हत्यारांचा वापर घातपाती कृत्यासाठी वापर करायचा होता, असे अधिकाºयानी सांगितले.
गोंधळेकरकडे शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च बॅटरी, हॅण्ड ग्लोव्हज्, स्फोटकांबाबतची माहिती पुस्तिका, रिले स्विच सर्किट ड्रॉर्इंग पेन ड्राइव्हज्, हार्डडिक्स, मेमरी कार्ड व पुस्तकेही सापडली असून, त्यांचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जात होता, असे सांगण्यात आले.