१२ वर्षाच्या मुस्लीम मुलीने मारली भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी
By Admin | Published: April 3, 2015 01:56 PM2015-04-03T13:56:52+5:302015-04-03T13:57:44+5:30
मुंबईत राहणा-या १२ वर्षाच्या मरियम सिद्दीकी या मुलीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवद् गीता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबईत राहणा-या १२ वर्षाच्या मरियम सिद्दीकी या मुलीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवद् गीता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. सहावीत शिकणा-या मरियमने सुमारे ३ हजारहून अधिक स्पर्धकांना मागे टाकून स्पर्धेत बाजी मारली आहे. एकीकडे देशात घरवापसी सारख्या मोहीम राबवत देशाच्या ऐक्यात बाधा आणण्याचे उद्योग काही मंडळीकडून सुरु असताना मरियम भगवद् गीतेवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून एकतेचे संदेशच दिला आहे.
इस्कॉनतर्फे यंदा 'गीता चॅम्पियन्स लीग' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गीतेवर आधारीत १०० मार्कांचे प्रश्न विचारण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने भगवद् गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे मरियम सांगते. मरियमच्या या निर्णयाला तिच्या आईवडिलांनीही पाठिंबा दिला. मरियम सध्या मीरा रोडमधील कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये शिकते.मला धर्मांचा अभ्यास करायला आवडतो व फावल्या वेळेत मी विविध धर्मांवरील पुस्तकांचे वाचन करते असे मरियम नमूद करते. परीक्षेपूर्वी मी भगवद् गीतेचा अभ्यास केला, गीतेतून आपल्याला काय शिकायला मिळते हे मी समजून घेतले व मगच स्पर्धेत उतरल्याचे मरियम आत्मविश्वासाने सांगते. एका मुस्लिम मुलीने भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी मारल्याने शाळेतील शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आमच्या कुटुंबाने कधीच धर्मात भेदभाव केला नाही. सर्व धर्म समान आहेत, प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्मांचा आदर करावा व त्या धर्मांचा स्वीकारही करावा असे मरियमचे वडिल फारुख सिद्दीकी यांनी सांगितले. कोणत्याही धर्मात हिंसा किंवा द्वेष करणे शिकवले जात नाही. दुर्दैवाने आपल्याकडे काही जण असा चुकीचा संदेश पसरवतात असे फारुख यांनी स्पष्ट केले. या सर्व गोष्टींचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होण्यापूर्वी पालकांनी मुलांशी संवाद साधून काय चुकीचे आहे हे मुलांना समजवावे असा सल्लाही त्यांनी अन्य पालकांना दिला.