१.२0 लाख लिटर केरोसीन साठा, मागेल त्याला गॅस

By admin | Published: June 30, 2014 01:49 PM2014-06-30T13:49:33+5:302014-06-30T13:49:33+5:30

आषाढी यात्रा सोहळ्याला येणार्‍या भाविकांसाठी १ लाख २0 हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. तर यात्रा कालावधीत मागेल त्या भाविकांना अनुदानित दरानुसार गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे.

1.20 lakh liters of kerosene, ask for gas | १.२0 लाख लिटर केरोसीन साठा, मागेल त्याला गॅस

१.२0 लाख लिटर केरोसीन साठा, मागेल त्याला गॅस

Next

 

 
पंढरपूर आषाढी यात्रा: पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज, काळाबाजार रोखण्यासाठी २७ जणांचे पथक
 
देखरेखीसाठी २७ जणांचे पथक
 
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्याला येणार्‍या भाविकांसाठी १ लाख २0 हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. तर यात्रा कालावधीत मागेल त्या भाविकांना अनुदानित दरानुसार गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत केरोसीन व गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी २७ अधिकार्‍यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, शहरात ५३ ठिकाणी केरोसीन तर दोन ठिकाणी गॅसचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षक पी. बी. वायदंडे यांनी दिली.
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक व अन्य राज्यांतील भाविक असे तब्बल १0 लाख भाविकांची मांदियाळी असते. यामध्ये विदेशी नागरिकांचाही मोठा सहभाग असतो. आषाढी सोहळ्यासाठी श्रीसंत ज्ञानेश्‍वर, श्रीसंत तुकाराम महाराज या प्रमुख संतांच्या पालख्यांसह येणार्‍या लहान-मोठय़ा दिंड्यांमधील भाविकांसाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत सवलतीच्या दरात केरोसीन व गॅसचा पुरवठा करण्यात येतो.
यावर्षी आषाढीसाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेऊन तालुका पुरवठा विभागाने २ लाख ८0 हजार लिटर केरोसीन साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने १ लाख २0 हजार लिटर केरोसीन साठा उपलब्ध केला आहे. या केरोसीनचे पंढरपूर शहरासह वाखरी पालखी तळावर एकूण ५३ ठिकाणांहून वितरण करण्यात येणार आहे. तालुका पुरवठा विभागाच्या मागणीनुसार जिल्हा पुरवठा विभागाने गॅसचा मुबलक साठा उपलब्ध केला असून, दिंडीतील मागेल त्या भाविकांना सवलतीच्या दरात गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. या गॅसचे वितरण शहरातील अश्‍विनी व बालाजी गॅस एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे. ऐन यात्रा कालावधीत वाहतुकीच्या प्रश्नामुळे वितरणावर परिणाम होऊ नये म्हणून १५ दिवस अगोदरच अश्‍विनी गॅस एजन्सीकडे ६५00 तर बालाजी गॅस एजन्सीकडे ३५00 अशा १0 हजार सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला आहे.
शहरातील या वितरणाशिवाय पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, भंडीशेगाव व वाखरी पालखी तळावर गॅस वितरणासाठी भोसे, करकंब, कासेगाव येथील ग्रामीण वितरकांचे सहकार्य घेण्यात येणार असून पालखी मार्गावर असणार्‍या गावांनाही भाविकांची संख्या लक्षात घेऊन केरोसीन कोटा वाढवून देण्यात आला आहे. गॅस व केरोसीनचे पारदर्शक वितरण व्हावे, यासाठी तालुका पुरवठा विभागाने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचे पुरवठा निरीक्षक पी. बी. वायदंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
यात्रा कालावधीत येणार्‍या भाविकांना गॅस व केरोसीनचे वितरण पारदर्शकपणे व्हावे यासाठी पुरवठा विभागाने आपली पूर्ण यंत्रणा तयार ठेवली आहे. प्रत्येक गरजू भाविकांना केरोसीन व गॅसचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तरीही काही वितरकांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यासाठी खास पथकांचीही नियुक्ती केली आहे. - पी. बी. वायदंडे, तालुका पुरवठा निरीक्षक 
■ मागील आषाढी यात्रा कालावधीत यात्रेतील भाविकांना गॅस सिलिंडरसाठी १२00 रूपये मोजावे लागत होते. मात्र यावर्षी सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे ४५७ रूपये या सवलतीच्या दरातच गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविक, दिंडीकर्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
■ पालख्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरपूर-फलटण या प्रमुख पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे भंडीशेगाव, पिराची कुरोली, वाखरी येथे वाहतुकीमुळे वितरणात अडचणी येतात. हा प्रसंग पुन्हा येऊ नये यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अगोदरच गॅस व केरोसीन साठा करण्याच्या हालचाली पुरवठा विभागाने सुरू केल्या आहेत.
 ■ आषाढी यात्रा कालावधीसाठी येणार्‍या लाखो भाविकांची संख्या लक्षात घेऊन काही गॅस व केरोसीन विक्रेत्यांकडून काळाबाजार होण्याची शक्यता असते. यापूर्वीही असे अनेक प्रकार घडून वितरणामध्ये गोंधळ झाला होता. असे प्रकार पुन्हा घडू नयेत व त्याचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी जिल्ह्यातील चार नायब तहसीलदार दर्जाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी व २३ पुरवठा निरीक्षक असे २७ जणांचे खास पथक तैनात करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत गुप्त पद्धतीने पाळत ठेवणार असल्याने काळाबाजारावर नियंत्रण येणार आहे.
 

Web Title: 1.20 lakh liters of kerosene, ask for gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.