१२० वर्षे जुन्या वडसा रेल्वेस्थानकाचे रूप पालटू लागले
By admin | Published: September 14, 2016 01:47 AM2016-09-14T01:47:19+5:302016-09-14T01:47:19+5:30
१८९६ काळात निर्माण झालेल्या १२० वर्ष जुन्या गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर
विकासकामांना आली गती : नक्षलग्रस्त भागातील एकमेव रेल्वेस्थानक
पुरूषोत्तम भागडकर देसाईगंज
१८९६ काळात निर्माण झालेल्या १२० वर्ष जुन्या गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असून या रेल्वेस्थानकाचे रूप पालटण्यास सुरूवात झाली आहे.
देसाईगंज रेल्वेस्थानकाची निर्मिती कधी झाली, याची नामोल्लेख कुठेही नसला तरी शकुंतला रेल्वेगाडी पुलिया (नॅरोगेज) जुना रेल्वेपूल निर्मिती वर्ष १८९६ असे लिहिलेले आहे. त्यानुसार या रेल्वेस्थानकाच्या निर्मितीला यंदा १२० वर्ष पूर्ण झाले असल्याचे निश्चितपणे म्हणता येईल. अंदाजे ९ ते १० दशक हा रेल्वे मार्ग नॅरोगेजच होता. मागील १२ वर्षांपूर्वी याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले व येथून गोंदिया, बल्लारशहापर्यंत प्रवाशी रेल्वे वाहतूक सुरू झाली व शकुंतलेचा प्रवास थांबला. मागील दोन वर्षात शकुंतला चालत असलेल्या या रेल्वे मार्गावर अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. फलाट, सिंगल व्यवस्था तयार करण्यात आली.
नक्षलग्रस्त भागातील रेल्वेस्थानक म्हणून वडसा रेल्वेस्थानकाची ओळख आहे. २० कोटी रूपये या रेल्वेस्थानकाच्या कायापालट करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांना वेग आला आहे. येथे पूर्वी दोन रेल्वेट्रॅक होते. आता नवीन दोन अतिरिक्त रेल्वेट्रॅकचे काम सुरू आहे. उत्तर-दक्षिण सिग्नलच्या दरम्यान रेल्वे मार्गाचे काम निर्माधिन आहे. इंग्रजकालीन वास्तूतून या रेल्वेस्थानकाचे काम चालविले जात होते. या सर्व इमारती निर्लेखीत करण्याचे काम सुरू असून नवीन इमारतीचे बांधकामही येथे वेगाने सुरू आहे. रेल्वेस्थानकात नवीन इमारती, कार्यालय, सिग्नल व्यवस्था, गुडस् ट्रॅक, कृषी व्यावसायिक माल ठेवण्यासाठी नवीन फलाट, गोडाऊन व रेल्वे स्थानक परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पुलाचे बांधकाम, नवीन क्रॉसींग यंत्रणा उभारली जात आहे. संपूर्ण रेल्वेस्थानक यंत्रणेचे डिजीटलायझेशन करण्यात आले असून लवकरच येथून गडचिरोलीसाठी नवा रेल्वेमार्गही तयार केला जाणार आहे. यासाठी भूमीअधिग्रहण करण्यात येत आहे. यालाही गती देण्यात आली आहे.