१,२०० लक्षवेधी, दहा हजारांवर प्रश्नांचा पाऊस; विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:39 AM2022-12-13T05:39:11+5:302022-12-13T05:39:34+5:30
विधिमंडळाचे सचिवालय १० डिसेंबर रोजी नागपुरात दाखल झाले. सोमवार, १२ डिसेंबरपासून सचिवालयाने पूर्णपणे कामकाजास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सोमवारी पहिल्याच दिवशी १२०० वर लक्षवेधींचा पाऊस पडला. तर दोन्ही सभागृहात आमदारांनी १० हजारांवर प्रश्न दाखल केले आहेत. प्रश्न विचारण्यासाठी आमदारांमधील हा उत्साह पाहता हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.
विधिमंडळाचे सचिवालय १० डिसेंबर रोजी नागपुरात दाखल झाले. सोमवार, १२ डिसेंबरपासून सचिवालयाने पूर्णपणे कामकाजास सुरुवात केली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसाठी प्रश्न व लक्षवेधी ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्या जातात. विधानसभेसाठी आजवर ६,८४७ तर परिषदेसाठी ३,०१० प्रश्न आले आहेत. सोमवारपासून लक्षवेधी स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ पर्यंत विधानसभेसाठी ८८७ तर परिषदेसाठी ३३० लक्षवेधी आल्या होत्या. या सर्व लक्षवेधींची मंगळवारपासून विभागनिहाय विभागणी केली जाईल.
समृद्धीच्या अवैध उत्खननावरही लक्षवेधी
समृद्धी महामार्गासाठी कंत्राटदारांनी केलेल्या अवैध उत्खननाचा मुद्दा विधिमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सभागृहातील आमदारांनी या विषयावर प्रश्न व लक्षवेधी दाखल केल्या आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विधान भवनातील कार्यालय सज्ज झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाकडून विदर्भातील विविध समस्यांवरच जास्तीत जास्त प्रश्न टाकण्यात आले आहेत.
विधिमंडळ सुरक्षा
रक्षक तैनात
विधिमंडळ परिसराचा विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी ताबा घेतला आहे. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासून, नाव नोंदणी करूनच विधिमंडळ परिसरात प्रवेश दिला जात आहे.
सभागृह प्रश्न लक्षवेधी
विधानसभा ६८४७ ८८७
विधान परिषद ३०१० ३३०