१२३ गावांतील पिण्याचे पाणी दूषित
By admin | Published: September 21, 2015 01:27 AM2015-09-21T01:27:00+5:302015-09-21T01:27:00+5:30
सतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत.
सुरेश लोखंडे , ठाणे
सतत बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागांत साथीच्या आजारांनी बहुतांशी रुग्ण त्रस्त आहेत. गॅस्ट्रोसह अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, डेंग्यू आणि विषमज्वर आदी साथीच्या आजारांनी त्रस्त असलेल्या गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासले असता सुमारे १२३ गावांचे पाणी दूषित असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले.
जलजन्य साथीच्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथमत: शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावपाड्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतांच्या, विहिरींच्या, नळांच्या सुमारे एक हजार २४३ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १२३ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे उघड झाले आहे.
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी केली. त्याअंतर्गत दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या ग्रामपंचायतींना लाल कार्ड देऊन त्यांचे अशुद्ध पाणी देणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वर्गीकरण केले.