१२५ शहरे २ आॅक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त
By admin | Published: August 25, 2016 05:29 AM2016-08-25T05:29:55+5:302016-08-25T05:29:55+5:30
२ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई : ‘अमृत मिशन’साठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये सुरु असलेली कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याबरोबरच येत्या २ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अमृत मिशन, स्मार्ट शहरे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदींचा आढावा फडणवीस यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुणे आणि सोलापूरसाठी २७९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अमृत मिशनसाठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये राज्यातील ७६ टक्के नागरी वस्ती आहे. सॅपमधून राज्यात येत्या तीन वर्षांत ७ हजार २२७ कोटी रु पयांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये केंद्र शासन ३६०० कोटी रु पये, राज्य शासन १८०० कोटी रु पये तर संबंधित शहरे १८०० कोटी रु पये उपलब्ध करु न देणार आहे.
यंदा १ हजार ९८९ कोटी रुपयांचे २२ प्रकल्प सुरू होतील. त्यात अचलपूर, यवतमाळ, वर्धा, उस्मानाबाद, मालेगांव, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, हिंगणघाट, अमरावती, लातूर, जळगांव अहमदनगर, वसई-विरार, अंबरनाथ, पनवेल, कुळगाव-बदलापूर, पिंपरी चिंचवड या शहरातील पाणीपुरवठयाचे २१ तर उल्हासनगर येथील घनकचऱ्याच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे. पुढील वर्षी २४८९ कोटी रु पयांचे २५ प्रकल्प राबविणार असून त्यामध्ये पाणी पुरवठयाचे १४ तर घनकचऱ्याचे १० व सांडपाण्याचा पुनर्वापराचा एक प्रकल्प आहे. त्यानंतरच्या वर्षी २७४८ कोटी रु पयांचे प्रकल्प करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>गेल्या १० वर्षापासून सुरु असलेले
८११० कोटी रु पयांच्या १४० प्रकल्पापैकी ५५ प्रकल्प २०१६-१७ मध्ये पूर्ण करण्यात येतील. त्यामध्ये चंद्रपूर, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, सावनेर, पुसद, औरंगाबाद, अमरावती येथील प्रकल्पांचा समावेश आहे. तर उर्वरित ८५ प्रकल्प २०१७-१८ मध्ये
पूर्ण करण्यात येणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात १.८७ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक १२९८२ शौचालये पुणे महापालिकेने बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तेथील महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले.