पावसाळ्यात मुंबईतील 125 नाले तुंबणार, पालिकेने केली यादी जाहीर
By admin | Published: June 18, 2016 09:29 PM2016-06-18T21:29:11+5:302016-06-18T21:29:11+5:30
स्थानिक रहिवाशी कचरा फेकत असल्याने या ठिकाणी पाणी तुंबणारच, अशी घोषणा करुन पालिकेने पावसाआधीच हात वर केले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - यंदा मुंबईची तुंबापुरी होण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केल्याने पालिका प्रशासनाने बचावाचा पावित्र घेतला आहे. त्यानुसार तुंबण्याची शक्यता असलेल्या 125 नाल्यांची यादी पालिकेने आज जाहीर केली आहे. स्थानिक रहिवाशी कचरा फेकत असल्याने या ठिकाणी पाणी तुंबणारच, अशी घोषणा करुन पालिकेने पावसाआधीच हात वर केले आहेत.
मुंबईत अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही़ मात्र काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीत काही तुरळक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदार मिळत नसल्याने नाल्यांची सफाई यंदा उशीरा सुरु झाली़ तर ब-याच ठिकाणी ठेकेदार फिरकलेही नाहीत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षांसह सत्ताधा-यांनीही नालेसफाईच्या पाहणीनंतर व्यक्त केली होती़.
मात्र तुंबणा-या नाल्यांसाठी पालिकेने स्थानिक रहिवाशांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. नाल्यांच्या परिसरातील रहिवाशी वारंवार कचरा टाकत असल्याने नाले तुंबतात, असा युक्तिवाद करीत दंडाची तयारीही पालिकेने केली होती़. मात्र ही कारवाई व्यवहार्य नसल्याने पालिकेने 125 नाल्यांची यादी आज जाहीर करुन स्थानिक रहिवाशांनाच जबाबदार धरले आहे.
नाल्यांवर झळकतायेत फलक
आपला दावा खरा करुन दाखविण्यासाठी पालिकेने नाल्यांवर फलक लावले आहेत. यामध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यापूर्वीचे गाळ काढताना व काढल्यानंतर असे तीन छायाचित्र टाकण्यात आले आहेत.
तुंबणारे सर्वाधिक नाले देवनार, मानखुर्दचे
स्थानिक रहिवाशी कचरा टाकत असलेल्या नाल्यांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. यामध्ये देवनार, मानखुर्द, रफी नगर, चेंबूर, गोवंडी येथील सर्वाधिक 17 नाल्यांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ प्रतीक्षा नगर, सायन, वडाळा, कुर्ला, घाटकोपर, विद्याविहार,भांडुप, अंधेरी, विलेपार्ले येथील नाल्यांचा समावेश आह़े
* मुंबईत मोठे व छोटे नाले तसेच नदींची एकूण लांबी 650 कि़मी़ आह़े यापैकी शहरात 109 कि़मी़, पूर्व उपनगरांमध्ये 230 कि़मी़ आणि पश्चिम उपनगरांमध्ये 311 कि़मी़ लांबीचे नाले आहेत