लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:59 PM2020-05-04T13:59:54+5:302020-05-04T14:11:10+5:30

सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सव्वाशे मजूर अडकले काश्मीरमध्ये

125 workers from Maharashtra stuck in Kashmir | लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती

लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती

Next
ठळक मुद्देराज्य शासनाने महाराष्ट्रात येण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी विनंतीलॉकडाऊनमुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी पडले आहेत अडकून

राहुल शिंंदे-    
पुणे : केवळ महाराष्ट्रात मजुरी करण्यासाठी आलेले मजूर आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत, तर महाराष्ट्रातील काही मजूरही इतर राज्यांमध्ये अडकले असून त्यांची महाराष्ट्रात आपल्या गावी येण्यासाठी धडपड सुरू आहे. सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सव्वाशे मजूर काश्मीरमध्ये अडकले असून राज्य शासनाने महाराष्ट्रात येण्यासाठी आम्हाला मदत करावी, अशी विनंती या मजुरांनी केली आहे.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या  ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात विद्यार्थी, मजूर, लहान-मोठे व्यापारी आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात अडकून पडलेले मजबूत पायी प्रवास करीत आपल्या राज्याकडे निघाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य शासनाने अनेक मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. पंरतु, काही मजुरांपर्यंत मदत पोहोचून शकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातील अनेक इतर राज्यातही कमी-अधिक प्रमाणात ही अशाच प्रकारचे चित्र आहे. इतर राज्यात अडकून पडलेले महाराष्ट्रातील मजूरही महाराष्ट्रात येण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे नियमानुसार अर्ज करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सव्वाशे मजूर काश्मीरमधील श्रीनगर येथे सराफ बाजार व आसपासच्या भागात सोने-चांदी गाळण्याचे काम करतात. त्यात म्हसवड, तासगाव, सांगोला, माण या तालुक्यांमधील मजुरांचा समावेश आहे. श्रीनगर जिल्हा प्रशासनाकडे येथील ७३ मजुरांनी महाराष्ट्रात जाण्यासाठी लेखी अर्ज केला आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे श्रीनगरचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला. यामुळे या परिसरातून कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी दिली जात नाही. काश्मीरमध्ये प्रताप येवले, प्रभाकर येवले, अतुल काटे, योगेश काटे, संतोष जाधव, दत्ता निंबाळकर, तानाजी मोहिते आदी मजूर अडकून पडले आहेत. 
......
मजुरांनी पत्रव्यवहार केल्यास शासन आदेशानुसार कार्यवाही करू
श्रीनगर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना प्रथमत: तेथील स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रात जाण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ही परवानगी प्राप्त झाल्यानंतर या मजुरांनी महाराष्ट्र शासनाकडे आवश्यक पत्रव्यवहार करावा. त्यानंतर या मजुरांना महाराष्ट्रात आणण्यासाठी शासन आदेशानुसार योग्य कार्यवाही केली जाईल, असे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैैसेकर यांनी सांगितले.
......
गेल्या अनेक वर्षांपासून श्रीनगर भागातील सराफ बाजारात सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमधून अनेक मजूर मजुरीसाठी येतात. त्यात सांगली जिल्ह्यातील मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी येथील ७३ मजुरांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला आहे. परंतु, अद्याप त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शासनाने आम्हाला येथून घेऊन जाण्यासाठी मदत करावी, ही सर्व मजुरांच्यावतीने विनंती.
 - प्रताप येवले, मजूर 
.........

Web Title: 125 workers from Maharashtra stuck in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.