यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष

By admin | Published: August 30, 2016 02:02 AM2016-08-30T02:02:08+5:302016-08-30T02:02:08+5:30

स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले

125th year of this year's public Ganeshotsava | यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष

यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष

Next

पुणे : स्वातंत्र्यचळवळीला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिशा देण्याचे महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांनी केले. १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी शालूकरांच्या बोळात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५वे वर्ष आहे, असा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने केला आहे. परंतु शासनाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव चळवळीचे पुढील शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष असल्याची घोषणा करून या उत्सवाच्या संस्थापकांवर एकप्रकारे अन्यायच केला आहे असे सांगत यंदाचे वर्ष हे कायमस्वरूपी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाने साजरे केले जावे अशी मागणी ट्रस्टतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
ट्रस्टने सोमवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावेही सादर केले. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त सूरज रेणुसे, अध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव राजेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष भाऊ निकम, सहसचिव दिलीप आडकर आणि प्रवक्ता दत्ता माने उपस्थित होते.
जीर्णोद्धारादरम्यान काही कागदपत्रे उपलब्ध झाली, त्यामध्ये रंगारी यांनी १८९२मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, असा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. वर्षापूर्वीच यासंदर्भातील माहिती देणारे रंगारी यांचे मृत्यूपत्र ट्रस्टला मिळाले आहे असे सांगून रेणुसे म्हणाले, स्वातंत्र्याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरदार नानासाहेब खासगीवाले यांच्याशी केलेल्या चर्चेतून क्रांतीची वाट सुकर झाली. सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मूर्तरूप धारण करू लागली. १८९२मध्ये शालूकरांच्या बोळात म्हणजे आत्ताच्या भाऊ रंगारी मार्ग येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. पुण्यात एकूण तीन गणपती बसविण्यात आले. त्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खासगीवाले यांचा समावेश होता.
या प्रेरणेने पुढील वर्षी १८९३मध्ये शंभर तरी गणपतींची संख्या वाढली. लोकमान्य टिळकांनी केसरीमधील २६ सप्टेंबर १८९३च्या अंकात या उपक्रमाचे कौतुक केले होते. १८९४मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यामध्ये गणपती बसविला. श्रीमंत भाऊसाहेबांनी आपली संपूर्ण मिळकत मृत्युपत्राद्वारे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दिली. भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या मृत्युपत्रात सर्वत्र साजरा होणारा गणपतीचा सार्वजनिक उत्सव हा आमच्या नावाने साजरा करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती, त्याचा मान राखला जावा हीच आमची अपेक्षा आहे.

Web Title: 125th year of this year's public Ganeshotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.