विमानतळावरून १२६ आयफोन जप्त
By admin | Published: March 11, 2017 01:35 AM2017-03-11T01:35:33+5:302017-03-11T01:35:33+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या दोन कारवायांत १२६ आयफोनसहित साडे सोळा लाख किमतीचे सोने जप्त केले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हवाई गुप्तचर यंत्रणेने केलेल्या दोन कारवायांत १२६ आयफोनसहित साडे सोळा लाख किमतीचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणी दोन प्रवाशांना अटकही करण्यात आली असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.
जोहान्सबर्ग येथून इथोपियन फ्लाईट ईटी - ६१०मधून मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवासी आसीफ इक्बाल मुनाफ मलीक याला तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत पोलिसांनी एका ब्लॅक सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवलेले आयफोन जप्त केले. यामध्ये १२१ जुन्या वापरलेल्या आयफोनसह ५ नव्या आयफोनचा समावेश होता. मलीक या आयफोनची मुंबईत कुणाकडे विक्री करणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे.
तर दुसऱ्या कारवाईतून बँकॉकवरून एअर इंडिया फ्लाईट एआय - ३३१मधून आलेल्या प्रवासी रामलाल मोहनलाल मनशारमानीच्या संशयास्पद हालचालींकडे तपास यंत्रणेचे लक्ष गेले. त्याच्या अंगझडतीतून तब्बल ५५१ ग्रॅमचे सोन्याचे सहा तुकडे आढळून आले. त्याने अंतरवस्त्रातील एका खिशात हे सोने लपवून ठेवले होते. याची किंमत एकूण १६ लाख ५० हजार ५५४ इतकी आहे.
तळपायाला सोने
तपास यंत्रणेपासून वाचण्यासाठी ही मंडळी नानाविध शक्कल लढविताना दिसत आहेत. मात्र तपास यंत्रणेच्या कडेकोट सुरक्षेमुळे ते यामध्ये अडकले जात आहेत. यापूर्वीच्या कारवाईत सोने तस्कराने चक्क तळपायाला सोने चिकटवले होते.