कुष्ठरोगाचे १२६ नवे रुग्ण
By admin | Published: March 9, 2015 01:52 AM2015-03-09T01:52:01+5:302015-03-09T01:52:01+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेली कुष्ठरोग शोध मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात १२६ कुष्ठरुग्ण आढळले आहेत.
ठाणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेली कुष्ठरोग शोध मोहीम अखेर पूर्ण झाली आहे. या मोहिमेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात १२६ कुष्ठरुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी ९ अशा एकूण १८ बालकांचा समावेश आहे. सर्वाधिक ७३ रुग्ण नव्या पालघर जिल्ह्यात आढळले आहेत. दोन्ही जिल्ह्यांत पुरुषांमध्ये या रोगाचे ६२ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत ३० दिवस दोन्ही जिल्ह्यांत कुष्ठरोग निरीक्षण कार्यक्र मांतर्गत जनजागृती व शोध मोहीम राबवण्यात आली. याचदरम्यान, ठाणे जिल्ह्यात १८ लाख ३० हजार ८०७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५३ नवीन रुग्ण आढळून आले. २५ पुरुष, १९ महिला आणि ९ बालकांचा
समावेश आहे. तर पालघर
जिल्ह्यात २३ लाख ८२ हजार ९७२ जणांची तपासणी केली असता ७३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ३७ पुरुष, २७ महिला, ९ बालकांचा समावेश आहे.
या जनजागृती व शोध मोहिमेंतर्गत दोन्ही जिल्ह्यांत आरोग्य विभागाने २८८ ठिकाणी जनजागृती रॅली काढली. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धाही घेतल्या. तसेच परिचारिका प्रशिक्षणार्थींनी पथनाट्य सादर केले. सहायक संचालक, कुष्ठरोग निर्मूलन डॉ. किरण गायकवाड यांनी ही माहिती दिली.