केंद्राकडून १२६९ कोटी अर्थसाह्य!
By admin | Published: September 29, 2016 06:33 AM2016-09-29T06:33:27+5:302016-09-29T06:33:27+5:30
महाराष्ट्रातील गतवर्षाच्या दुष्काळासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने, बुधवारी १,२६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
- महाराष्ट्राला दुष्काळाची नुकसानभरपाई
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गतवर्षाच्या दुष्काळासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने, बुधवारी १,२६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळासाठी केंद्रीय साहाय्य म्हणून अनुदान स्वरूपात मिळणाऱ्या या रकमेत खरीप पिकांसाठी ५८९.४७ कोटींची तर रब्बी पिकांसाठी ६७९.५४ कोटींची तरतूद आहे. पिकांच्या नुकसानभरपाईच्या स्वरूपात ही मदत केंद्रातर्फे राज्य सरकारच्या हवाली करण्यात येईल.
महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, केंद्र सरकारने पथक पाठवले होते. पथकाचा जो अहवाल प्राप्त झाला, त्यावर विचार विनिमय करण्यासाठी केंद्राच्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासह केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री राधामोहनसिंग, गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहऋ षी यांच्यासह गृह, कृषी व अर्थ मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)