१२७ उद्योजकांच्या जमिनी परत घेणार
By admin | Published: January 29, 2015 04:16 AM2015-01-29T04:16:29+5:302015-01-29T04:16:29+5:30
उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही.
औरंगाबाद : उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही. त्या जमिनी परत घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूरमध्ये नऊ जागा ताब्यात घेण्यात आल्या. औरंगाबाद विभागात १२७ उद्योजकांकडे जमिनी अडकल्या आहेत. उद्योग उभारणीसाठी अटी, शर्थी शिथिल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ‘सेझ’चा अनुभव अतिशय वाईट आहे. यासंदर्भात शासन आढावा घेत असून, लवकरच निश्चित असे धोरण जाहीर होईल. उद्योगांसाठी विजेचे दर आव्हानात्मक आहेत. दर कमी करण्याचा हेतू शासनाचा आहे. मराठवाड्याच्या विकासाशी आमची बांधिलकी असून, त्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात राज्य सरकारने नागपूरची घोषणा केली असली तरी केंद्र शासनाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाला औरंगाबादेत मूलभूत सोयी-सुविधा योग्य वाटल्यास या शहराची निवडही होऊ शकते, असे देसाई यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)