एमएचटी-सीईटीतील १२७ प्रश्न चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:16 AM2019-05-22T06:16:48+5:302019-05-22T06:16:50+5:30

१२ अभ्यासक्रमाबाहेरचे : एकूण २८३ प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी नोंदवले आक्षेप

127 questions in MHT-CET are wrong | एमएचटी-सीईटीतील १२७ प्रश्न चुकीचे

एमएचटी-सीईटीतील १२७ प्रश्न चुकीचे

Next

मुंबई : राज्यात २ ते १३ मेदरम्यान पार पडलेल्या एमएचटी-सीईटीतील २८३ प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. परीक्षेतील १२ प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे होते, काही चुकीचे होते तर काही प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी एकाहून अधिक पर्याय योग्य असल्याने गोंधळ उडाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या परीक्षेतील एकूण १२७ प्रश्न चुकीचे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी नोंदविले आहे.


बारावीनंतर अभियांत्रिकी, फार्मसी शाखेत प्रवेश घेण्यासाठी एमएचटी-सीईटी महत्त्वाची असते. राज्यात यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने २ ते १३ मेदरम्यान ही परीक्षा पार पडली. परीक्षेची उत्तरसूची नुकतीच सीईटी सेलकडून जारी करण्यात आली. परीक्षेतील प्रश्न, उत्तरसूची, उत्तरांचे पर्याय यासंदर्भातील आक्षेप रविवार, १९ मेपर्यंत नोंदविण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्वांत जास्त आक्षेप हे गणित आणि रसायनशास्त्र या विषयांतील प्रश्नांबाबत नोंदविले असून या आक्षेपांची संख्या प्रत्येकी ३५ आहे. भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांतील आक्षेपांची संख्या अनुक्रमे ७३ आणि १२ इतकी आहे. भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्रत्येकी ३, रसायनशास्त्राचे ६ तर गणिताचे ३ मिळून या परीक्षेतील एकूण १२ प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. तर, भौतिकशास्त्र ६ आणि गणिताच्या ९ प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. भौतिकशास्त्र ३६, रसायनशास्त्र ४३, गणित ४० तसेच जीवशास्त्राचे ८ मिळून या परीक्षेतील एकूण १२७ प्रश्न चुकीचे असल्याचा आक्षेपही विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे.


भौतिकशास्त्राच्या ३३, रसायनशास्त्राच्या ११०, गणिताच्या ३२, जीवशास्त्राच्या ७ प्रश्नांच्या उत्तरसूची चुकल्या असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. अशा प्रकारे एकूण १८२ प्रश्नांच्या उत्तरसूचीतील उत्तरे चुकल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. एका प्रश्नाला एकाहून अधिक उत्तरे असलेले प्रश्नही सीईटीच्या परीक्षेत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. अशा एकूण २३ प्रश्नांमध्ये भौतिकशास्त्राचे ८, रसायनशास्त्राचे ८, गणिताचे ४, जीवशास्त्राचे ३ प्रश्न होते.

‘त्यानंतरच जाहीर करणार अंतिम उत्तरसूची’
विद्यार्थ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची त्या त्या विषयातील तज्ज्ञ, नियामक छाननी करणार असून निर्णय घेणार आहेत. त्यानंतर परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे.

Web Title: 127 questions in MHT-CET are wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.