बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला, तर दहावीची 3 मार्चपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:03 PM2019-10-15T20:03:33+5:302019-10-15T20:35:16+5:30
दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात आल्या असून बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु हाेणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये घेतल्या जाणा-या दहावी - बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा येत्या 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा येत्या 3 मार्च पासून घेतली जाणार आहे,असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
राज्य मंडळातर्फे पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिध्द केले जाते.त्यानुसार 15 आॅक्टोबर रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.तर दहावीची परीक्षा येत्या 3 मार्च ते 23 मार्च या कालवधीत घेतली जाईल.मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांकडे छापील स्वरूपातील देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असणार आहे.त्यामुळे छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. त्याचप्रमाणे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले.तसेच व्हॅट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक गृहित धरू नका,असे मंडळाचे सचिव डॉ.अशोक्ल भोसले यांनी सांगितले.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कळविले जाईल. तसेच लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणा-या सूचनांचा विचार केला जाणार नाही,असेही मंडळाचे सचिव अशोक भोसले म्हणाले.