बारावी उत्तीर्णांना १० सप्टेंबरपर्यंत प्रवेश
By admin | Published: August 30, 2016 06:08 AM2016-08-30T06:08:39+5:302016-08-30T06:08:39+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश द्यावेत, असे सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना राज्य शासनातर्फे नुकतेच कळविण्यात आले आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलै- आॅगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता येणार आहे. मात्र, बारावीचा निकाल जाहीर होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही प्रवेशाबाबत शासनाकडून काहीच सांगितले जात नव्हते. शासनाकडून कोणताही लेखी पत्रव्यवहार न झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे विद्यापीठातील अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात होते. परंतु, राज्य शासनाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाविद्यालयांच्या प्रवेशाची तारीख १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी,असे पत्र पाठविले आहे.
राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी याबाबत सांगितले
की, बारावीच्या फेरपरीक्षेत
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी
१० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात यावीतसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)