गोडावून फोडून १३ लाखाचे मोबाईल चोरणाऱ्यांना अटक
By Admin | Published: August 1, 2016 10:42 PM2016-08-01T22:42:47+5:302016-08-01T22:42:47+5:30
वाघोली परिसरातील मोबाईलचे गोडावून फोडून तब्बल १३ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - वाघोली परिसरातील मोबाईलचे गोडावून फोडून तब्बल १३ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख ६ हजार रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़ एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी ही माहिती दिली.
कबीर बशिर शेख (वय २४, रा. गागोदे, ता.पेण, जि. रायगड. मुळ रा. धामणगाव, जि. जालना) आणि गोपाळ भिमसिंग मुराडे (वय ३०, मुळ रा. चांडोल, जि. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना २५ जानेवारी २०१६ रोजी घडली होती़
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील रिले एक्सप्रेस या कंपनीच्या शिवसरकार वेअर हाऊसचे पाठीमागील शटर उचकटुन चोरट्यांनी आत प्रवेश केला़ गोडावूनातील तब्बल १३ लाख ८६ हजार रुपयांचे चोरून नेले होते. घरफोडीची घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधिक्षक डॉ. जय जाधव यांनी एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांना तात्काळ गुन्हयाचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, उपनिरीक्षक अंकुश माने, कर्मचारी मोरेश्वर इनामदार, किरण आरूटे, राजेंद्र पुणेकर, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, सचिन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हयाची सखोल माहिती काढली. पोलिसांनी भिवंडी, कुर्ला, औरंगाबाद आणि पेण येथे आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते तेथे आढळुन आले नाहीत. गोडावून फोडणारे दोन संशयित वाघोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना सापळा रचुन अटक केली. त्यांच्याकडे तपासात त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने गोडावून फोडल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून १३ लाख ६हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
औरंगाबादमध्येही चोरले होते मोबाईल
या चोरट्यांनी औरंगाबाद येथील एका कंपनीचे गोडावून फोडून त्यातून मोबाईल चोरले होते़ जानेवारीमध्ये वाघोली येथील मोबाईल चोरल्यानंतर त्यांनी ते एका गोडावूनमध्ये ठेवले होते़ हे मोबाईल विकण्यासाठी ते ग्राहक पहात होते़ परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडल्याने जवळपास चोरीला गेलेला सर्व माल मिळाला आहे.