ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे १३ मंत्री शिंदेंचे, नावे जाहीर करणार; राऊतांचा स्फोटक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:25 IST2025-02-25T11:23:08+5:302025-02-25T11:25:37+5:30
खासगी ओएसडी आणि पीए म्हणून मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेल्या काही नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली. या निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं.

ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे १३ मंत्री शिंदेंचे, नावे जाहीर करणार; राऊतांचा स्फोटक दावा
"माझ्याकडे १२५ नावे आली असून त्यातील १०९ नावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित नावांना मी मंजुरी दिली नाही. मंत्रालयात त्यांच्याबद्दलचे मत फिक्सर असं आहे. कोणी नाराज झालं तरी ही मी अशा नावांना मान्यता देणार नाही", अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या भूमिकेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले. त्याचबरोबर ही नावे पाठवणारे शिंदे गटाचे आहेत, असा स्फोटक दावा राऊत यांनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचं स्वागत केले.
'ती नावे तुम्ही जाहीर करा'
संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितले आहे की, ओएसडी आणि पीए नियुक्तीसंदर्भात. जी यादी आली मंत्र्यांकडून त्यातील १६ जण दलाल आणि फिक्सर होते. माझं मुख्यंमत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आवाहन आहे की, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावे पाठवली होती, ती तुम्ही जाहीर करा. महाराष्ट्राच्या हितासाठी", अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
"हे कोण फिक्सर आहेत? हे जे दलाल, फिक्सर आहेत, त्यांची जी नावे पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री शिंदे गटाचे आहेत. म्हणजे शिंदेंच्या पक्षाचे. शिंदेंचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. हे सगळे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून गेले", असा दावा संजय राऊत यांनी केला.
माझ्याकडे १६ जणांची नावे आहेत -संजय राऊत
खासदार राऊत पुढे बोलताना म्हणाले की, "मी नावे देईन. माझ्याकडे १६ जणांची नावे आहेत. यात १३ शिंदेंचे आहेत आणि उरलेले अजित पवार गटाचे आहेत. मी मागेही म्हटलो होतो की, अजित पवारांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. अजित पवार पाप धुवायला, प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहेत की महाराष्ट्रात पाप धुवायला नद्या आहेत", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
फडणवीसांचं अभिनंदन करताना राऊत काय बोलले?
"या सगळ्यांचे फिक्सर ओएसडी आणि पीए होते, त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले, तरी राज्याच्या हिताच्या अशा निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो", अशा शब्दात राऊतांनी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
देवेंद्र फडणवीस काय बोलले?
"माणिकराव कोकाटेंना हे माहिती नसेल की खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवात आणि त्यावर अंतिम निर्णय करतात. हे काय नवीन नाही."
"मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले होते की, तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर म्हणून आहेत, ज्यांची नावे चुकीच्या कामात आली आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे १२५ नावे आली असून त्यातील १०९ नावांना मंजुरी दिली आहे. उर्वरित नावांना मी मंजुरी दिली नाही. कारण कुठला ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची कुठली तरी चौकशी सुरु आहे किंवा मंत्रालयात त्यांच्याबद्दलचे मत फिक्सर असं आहे. कोणी नाराज झालं तरी ही मी अशा नावांना मान्यता देणार नाही," अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली आहे.