पुण्यातील इनामदार कॉलेजचे १३ विद्यार्थी मुरूड येथील समुद्रात बुडाले
By admin | Published: February 1, 2016 05:22 PM2016-02-01T17:22:43+5:302016-02-01T18:27:44+5:30
पुण्यातील इनामदार कॉलेजचे १३ विद्यार्थी रायगडच्या मुरूड-जंजिरा येथील समुद्रात बुडाल्याची दु:खद घटना घडली.
Next
>ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. १ - सहलीसाठी आलेले पुण्याचे १३ विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथील समुद्रात बुडाल्याची दु:खद घटना आज दुपारी घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १८ जण पोहायला उतरले होते. त्यापैकी, चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. १३ जणांचे मृतदेह हाती लागले तर एकाचा शोध सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्याचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार कॉलेजचे सुमारे १२७ विद्यार्थी सहलीसाठी आज दुपारी मुरूड-जंजिरा येथे आले होते. त्यामध्ये ६६ मुलं, ५० मुली आणि १२ शिक्षकांचा समावेश होता. त्यापैकी काही विद्यार्थी दुपारी २.३० - २.४५ च्या सुमारास समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते समुद्रात बुडू लागले, हे पाहताच इतर विद्यार्थ्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. स्थानिक नागरिक आणि किना-यावरील जीव रक्षकांनी धाव घेत चार जणांना पाण्याबाहेर काढले. मात्र १३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतीय तटरक्षक दल, महसूल अधिकारी आणि पोलिसांतर्फे शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान वाचवण्यात आलेल्या चार विद्यार्थ्यांना उपचारांसाठी मुरुडच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान किना-यावर बचावकार्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली असून हेलकॉप्टरही पाठवण्यात आल्याची माहिती कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी ए इनामदार यांनी दिली. आत्तापर्यंत एकूण १३ विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळाली असून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतरच मुलांची नावे जाहीर केली जातील, असेही ते म्हणाले.