पोलिसांची १३ हजार पदे रिक्त
By admin | Published: December 21, 2015 01:55 AM2015-12-21T01:55:42+5:302015-12-21T01:55:42+5:30
पोलीस दलाच्या मंजूर मनुष्यबळातील रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी २ लाख २० हजार पोलिसांवर आहे
जमीर काझी, मुंबई
पोलीस दलाच्या मंजूर मनुष्यबळातील रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी २ लाख २० हजार पोलिसांवर आहे. पोलिसांचा फौजफाटा मंजूर असला, तरी त्यापैकी तब्बल १३ हजार ८५ पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. सर्वाधिक रिक्त पदांपैकी तब्बल ५ हजार १५ जागा प्रत्यक्ष तैनात राहणाऱ्या कॉन्स्टेबलच्या आहेत.
बदल्यांच्या अधिकारासंदर्भातील धोरणांची गेल्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीदेखील प्रत्यक्षात गृहविभागाचा कारभार मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाचा आढावा घेण्यासाठी १ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’ने मिळविलेली आहे.
पोलीस महासंचालक (डीजीपी) पासून कॉन्स्टेबलपर्यंत विविध १३ दर्जाची पदे आहेत. पैकी अप्पर महासंचालकांची ३० पैकी २४ पदे भरलेली आहेत. विशेष महानिरीक्षक ४१ पैकी ३५ जागा, तर उपमहानिरीक्षकाच्या ३७ पैकी २७, उपायुक्त/ अधीक्षकाच्या २६७ पैकी २३५ पदावर अधिकारी कार्यरत आहेत. एसीपी/डीवायएसपीची ६९० पदे मंजूर असून, सध्या ४९५ ठिकाणी अधिकारी कार्यरत आहेत. निरीक्षकांच्या ३४६६ पैकी ३२१० पदे भरलेली आहेत. एपीआयच्या ४४४१ पैकी ३८९० कार्यरत आहेत. पीएसआयच्या ९६८७ पैकी तब्बल २७८५पदे रिक्त आहेत. काही गुन्ह्यांच्या तपास कामाचे अधिकार असलेल्या सहायक फौजदार व हवालदाराची अनुक्रमे १८ हजार ८०४ व ४२ हजार ९६४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७,३२५ व ४१,००२ पदे कार्यरत आहेत. नाईक व शिपाईसाठी अनुक्रमे ४१ हजार ४३५ व ९६ हजार २४० जागा आहेत. त्यापैकी अनुक्रमे ४१ हजार ९३ व ९२ हजार २२५ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद हे जानेवारी अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूत पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुढील महिनाअखेरीस त्यांनी कार्यभार सोडल्यानंतर, दोन टप्प्यात एडीजी व आयजीची पदेही भरली जातील. त्याचप्रमाणे, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे १५० निरीक्षकांना बढती दिली जाईल, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
चार महिन्यांत
हजार पदे रिक्त
पोलीस दलात गेल्या आॅगस्ट महिन्यात १२ हजार जागा रिक्त असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यांच्या काळात नवीन भरती झालेली नाही. तथापि, सुमारे एक हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले आहेत.