विषारी दारूने घेतले १३ बळी!
By admin | Published: June 19, 2015 03:40 AM2015-06-19T03:40:01+5:302015-06-19T03:40:01+5:30
विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर
मुंबई : विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बळींची संख्या वाढण्याची भीती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राजू लंगडा व शंकर या दोन दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले.
लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कुटुंबीय राहतात. बुधवारी रात्री येथील नागरिकांनी गावठी दारूचे प्राशन केले. गुरुवारी पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. अनेकांना उलट्या-जुलाब, छातीत दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. त्यांना मालाडच्या खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकरापैकी तिघांचा मृत्यू प्राईम रुग्णालयात, ५ जणांचा शताब्दी रुग्णालयात, एकाचा सिद्धार्थ रुग्णालयात तर ४ जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनास्थळी धाव घेतली. इथिल अल्कोहोलपासून ही विषारी दारू बनविण्यात आल्याची माहिती समोर आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले की, उपचार घेणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तसेच याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती, उत्तर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील रात्री उशिरापर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले.
पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन
-मालवणी खारोडी गावातल्या गावदेवी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात लंगडा, शंकर हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून देशी-गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करत होते.
-देशी दारूच्या बाटल्या फोडून त्या छोट्या छोट्या पाऊचमध्ये ते विकत असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री करताना ते दारूत मिथेनॉल किंवा मिथाईल हे औद्योगिक रसायन मिसळून विकत असावेत, असा संशय आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या दारूचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी धाडण्यात आले आहेत.
-या घटनेनंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी तत्काळ या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने कोम्बिंग करून संशयितांना ताब्यात घेतले.
वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई?
मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यावर या दारूकांडानंतर तरी आयुक्त मारिया कारवाई करणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. २००४मध्ये विक्रोळी व ना. म. जोशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारूकांड घडल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकापासून उपायुक्तांपर्यंत सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.
याप्रकरणी राजू लंगडा व शंकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सर्वांनी नेमकी कोणती दारू प्यायली, ती कुठून आली, याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.
- धनंजय कुलकर्णी, पोलीस प्रवक्ते
मृतांची नावे : मेहबूब हुसेन शेख (४३), दिनेश कनोजिया (४०), दत्तात्रय धोंडे घमरे (५३),कन्हेही सकाई हरिजन (४०), रोहित दगडू
भालेराव (२४), लक्ष्मण येमापुरे (४०), अशोक हरिश खेमाडी(२५), रमेश रामतेकर(४०), सत्यवान भिकू म्हात्रे (४०), विजय रवी गजाला (२७), प्रमोद चव्हाण, किसन सोनवणे, देविड आरोग्यस्वामी चेट्टीयार.
यांच्यावर उपचार सुरू : पॉल चेट्टीयार (६२),
दयानंद मोहिते (३६), प्रदीप गालांडे (३०), फुलचंद गुलाब कनोजिया, अब्दुल अजिज शेख हुसेन (४५), कमलेश रामदुलार कनोजिया (३८), बबलू सुधाकर गालाते (३३), अशोक कनोजिया, दत्ता जयंत सोनावणे, मोहन कांचन शिंदे (३०)