उच्च शिक्षणासाठी १३०० कोटींचा निधी
By admin | Published: April 18, 2017 05:43 AM2017-04-18T05:43:50+5:302017-04-18T05:43:50+5:30
उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) १३०० कोटी रुपयांचा निधी विविध महाविद्यालये व विद्यापीठांना उपलब्ध करून देण्यात आला आहे
पुणे : उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत (रूसा) १३०० कोटी रुपयांचा निधी विविध महाविद्यालये व विद्यापीठांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी या उपक्रमाचा चांगला फायदा होऊ शकेल, असे जावेडकर यांनी या वेळी सांगितले.
देशभरातील विविध विद्यापीठांमधील १७ प्रकल्पांचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आॅनलाइन करण्यात आले. त्यापैकी एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटेलिजेन्ट सिस्टिम’ (सीआयएस) या केंद्राचे उद्घाटन जावडेकर यांनी दिल्लीतील मंत्रालयात बसून केले. या वेळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतून तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, रूसाच्या कन्सलटंट डॉ. जया गोयल, शक्ती सिंग, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर सहभागी झाले. जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड आदी राज्यांमधील १७ प्रकल्पांचे उद्घाटन झाले. या वेळी त्या - त्या राज्यांचे शिक्षणमंत्री, विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागांतर्गत सीआयएस सुरू करण्यात आले आहे. या सीआयएसच्या वतीने हातातील बोटांच्या ठशांचा आधार घेऊन सर्व आर्थिक व्यवहार करणारी ‘मायक्रो एटीएम’ मशीन शोधून काढली आहेत. त्यासाठी नागरिकांचा आधारकार्डचा डेटा बँक खात्याशी जोडावा लागणार आहे. परिणामी, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डऐवजी आता सर्व व्यवहार बायोमेट्रिकच्या आधारे करता येणार आहेत. सीआयएसला रूसाअंतर्गत पुढील ५ वर्षांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यापैकी दीड कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मिळाल्याची माहिती डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी दिली. (प्रतिनिधी)