तब्बल १३१ तास स्केटिंग!
By admin | Published: June 11, 2015 11:05 PM2015-06-11T23:05:48+5:302015-06-12T00:35:08+5:30
एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद : ३ ते २९ वयोगटातील १४६ जणांचा सहभाग
कोल्हापूर : येथील अॅमॅच्युअर रोलर स्केटिंग अकॅडमी आणि शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या १३१ तासांचा रिले पद्धतीचा विक्रम १४६ स्केटर्सनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजून ३१ मिनिटांनी पूर्ण केला. या विक्रमाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डने घेतली.
ताराबाई पार्क येथील बापूजी साळुंखे रोलर स्केटिंग रिंगवर झालेल्या विक्रमामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, रत्नागिरी, आदी ठिकाणांहून स्केटर्सनी सहभाग घेतला होता. १३१ तासांच्या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि. ६)च्या सकाळी सहा वाजता करण्यात आली होती; तर हा विक्रम गुरुवारी (दि. ११) रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे व ३१ सेकंदांनी नोंदविल्याचे एशिया बुक आॅफ रेकॉर्डचे प्रतिनिधी गौरव हंडुजा यांनी जाहीर केले.
रिले पद्धतीने झालेल्या विक्रमात कृती शहा (वय ३), पृथ्वीराज शिंदे (४), मृदुला जोशी, खुशी संघवी (३), नीता बेळगावकर या एकोणतीस वर्षीय महिलेसह ओम जगताप या गतिमंद मुलानेही या उपक्रमात सहभाग घेतला होता.
यावेळी परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज, प्राचार्या शुभांगी गावडे, अॅड. धनंजय पठाडे, डॉ. संदीप पाटील, स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम, धनश्री कदम, भास्कर कदम, कोल्हापूर अॅमॅच्युअर रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम, आदी उपस्थित होते.
बेळगावमधील शिवगंगा क्लबमध्ये नुकतेच सलग १२१ तास स्केटिंग करून विक्रम नोंदवला होता. आज कोल्हापुरातील स्केटिंगपटूंनी १३१ तास स्केटिंग करत हा विक्रम मोडला आहे.गेल्या सत्तावीस दिवसांमध्ये एशिया बुक आॅफ रेकॉर्डशी संबंधित २७ देशांमध्ये हा विक्रम कोणीही नोंदविलेला नाही.
-गौरव हंडुजा, प्रतिनिधी,
एशिया बुक आॅफ रेकॉर्ड
लक्षवेधी फलक
स्केटिंग रिंगवर केंद्राच्या वतीने ‘खाऊ नको मावा, कॅन्सर होईल भावा,’ ‘अहिंसा टाळा, दहशतवाद टाळा,’ ‘स्त्री-भू्रणहत्या रोखा,’ ‘पाणी वाचवा, देश वाचवा’ अशा संदेशांचे फलक विविध ठिकाणी लावले होते. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.