० ते १० पटसंख्या असलेल्या १३१४ शाळा पहिल्या टप्प्यात स्थलांतरीत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 07:43 PM2017-12-02T19:43:38+5:302017-12-02T19:44:41+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३१४ शाळांपैकी एकही शाळा बंद करण्यात आलेली नाही व शाळांमधील एकाही शिक्षकाची नोकरी कमी करण्यात आली नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विदयार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत कशा पध्दतीने समायोजन करण्यात येईल यासंदर्भातील पत्रकार परिषद आज मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी शिक्षण मंत्री यांनी समायोजन करताना विदयार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबर विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच विदयार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्वाचे असून शिक्षकांच्या नोकरी किंवा बदलीचा प्रश्न उदभवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आज अशा अनेक शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत जेथे विदयार्थी संख्या ० असली तरी शाळा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी तावडे म्हणाले की, शिक्षण हकक् कायदा, २००९ मध्ये २० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच १ किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या शाळा बंद करता येते. ऑक्टोबर, २०११ मध्ये जवळपास २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास १२ हजार हून अधिक शाळा होत्या. डोंगराळ, दुर्गम आणि आदिवासी भागात १ किमी अंतर मोजताना वेगळे नियम लावले जातात.
गेल्या काही दिवसामध्ये राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यातील ५००२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या दिसून आली. या ५००२ शाळांमधील ४३५३ शाळा जिल्हा परिषदेच्या तर ६९ शाळा खाजगी अनुदानित आहेत. या सर्व शाळांमधील विदयार्थ्यांना आणि शिक्षकांना जवळच्या शाळेत समायोजित केले जाणार असून याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अनेक शाळा समायोजित करीत असताना ० ते १० मुलांची पटसंख्या असलेल्या ४४२२ शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून १३१४ शाळांचे स्थलांतरण जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. २०९७ शाळांतील मुलांचे स्थलांतरण करता येऊ शकेल परंतु त्यासाठी वाहन आवश्यक आहे असे लक्षात आले आहे. तर जवळपास ९०९ शाळा स्थलांतरित करता येणार नाही, असे लक्षात आल्याने या शाळा बंद करण्यात येणार नाही. यामध्ये गडचिरोली येथील १३७, चंद्रपूर मधील १६, सिंधुदुर्गमधील ३५, ठाणे ४४, रत्नागिरी येथील १२५, रायगड येथील १०७ आणि सातारा येथील १०७ शाळा आहेत. ज्यांचे स्थलांतर करण्यात येणार नाही, असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान शालेय शिक्षण विभागाला करायचे नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन चांगल्या गुणवत्तेच्या शाळेत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणे.
· कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला.
· राज्यातील एकूण शाळांपैकी ५,००२ शाळांमधील मुलांची पटसंख्या ० ते १० या दरम्यान आहे.
· यापैकी ४,३५३ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत – (जिल्हा परिषद शाळांमध्ये ८०७२ शिक्षक आहेत.) आणि खाजगी अनुदानित शाळा ६९ आहेत – (खाजगी अनुदानित शाळांमध्ये २२० शिक्षक आहेत.) अशा एकूण ० ते १० पटसंख्या असलेल्या एकुण ४४२२ शाळा आहेत. उर्वरीत ५८० शाळा या आदिवासी, विना अनुदानित, सामाजिक न्याय, स्वयंअर्थसहाय्यित आदी प्रकारात मोडतात. त्यामुळे तुर्तास या ५८० शाळांचा विचार करण्यात आलेला नाही.
· ४४२२ शाळामधून २८,४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
· २०९७ शाळांचे स्थलातर होऊ शकते, मात्र त्यांना वाहनांची सोय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
· सर्वेक्षण करण्यात आलेल्या शाळांपैकी ९०९ शाळांचे स्थलांतर होऊ शकत नाही.
१३१४ शाळांची विभागनुसार आकडेवारी खालीलप्रमाणे.
मुंबई विभाग
मुंबई उपनगर –१
ठाणे ४५
पालघर ३२
रायगड १०३
नाशिक विभाग
जळगाव ८
धुळे ७
नंदुरबार ५
नाशिक ३१
पुणे विभाग
पुणे ७६
सोलापूर २१
अहमदनगर ४९
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर ३४
रत्नागिरी १९२
सांगली १६
सातारा ७३
सिंधुदुर्ग १५५
औरंगाबाद विभाग
औरंगाबाद ४०
जालना ६
परभणी १४
बीड २३
हिंगोली ४
लातूर विभाग
लातूर ८
उस्मानाबाद ७
नांदेड ६८
अमरावती विभाग
अमरावती ४९
अकोला १८
वाशिम ९
यवतमाळ ३०
बुलढाणा ८
नागपूर विभाग
नागपूर २४
वर्धा २९
भंडारा १२
गोंदिया ३२
चंद्रपूर ५३
गडचिरोली ४२