राज्यात १३३६ आरोग्य उपकेंद्रांना मिळणार आयुर्वेद डॉक्टर, ग्रामीण जनतेची होणार सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:10 AM2018-07-13T07:10:13+5:302018-07-13T07:11:43+5:30
राज्यभरात परिचारिकांच्या भरवशावरच चालणारे आरोग्य उपकेंद्र आता कात टाकणार आहे. राज्यातील तब्बल १३३६ उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होणार आहे.
हिंगोली : राज्यभरात परिचारिकांच्या भरवशावरच चालणारे आरोग्य उपकेंद्र आता कात टाकणार आहे. राज्यातील तब्बल १३३६ उपकेंद्रांमध्ये आयुर्वेद डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता डॉक्टरचा उपचार मिळणार आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र उपक्रमांतर्गत बीएएमएस अर्हताधारक डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर नेमले जातील. हिंगोली, वाशिम, गडचिरोली आदी मागास जिल्ह्यांतील सर्वच उपकेंद्रांना हे डॉक्टर देण्यात येतील. सध्या ३0 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. काही ठिकाणी तीस ते चाळीस गावांचा भार या केंद्रावर आहे. तेथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे या डॉक्टरांना उपकेंद्रांचे दौरे करणे शक्य होत नाही. उपकेंद्रांच्या ठिकाणी तर डॉक्टरच नाहीत. केवळ परिचारिकेच्या भरवशावर तिथला कारभार चालतो. अशावेळी उपकेंद्रातही चांगले उपचार मिळण्यासाठी आयुर्वेद डॉक्टर नेमण्याची ही योजना आहे. जुलै २0१८ अखेर आयुर्वेद डॉक्टरांची ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये समांतर आरक्षणाचे निकषही पाळावयाचे आहेत. शिवाय सुरुवातीचे सहा महिने प्रशिक्षण होणार असून त्यानंतर ११ महिन्याची कंत्राटी नियुक्ती दिली जाणार आहे.
१७ जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प
१७ जिल्ह्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी १३३६ डॉक्टरांची गरज आहे. यामध्ये गडचिरोलीत २३८, उस्मानाबाद-७८, नंदूरबार १७७, वाशिम १0८, वर्धा-४१, भंडारा-२५, सातारा-४७, चंद्रपूर-५0, सिंधूदुर्ग-८0, नांदेड-६0, जळगाव-२६, लातूर-३३, हिंगोली-१३१, अहमदनगर-३५, पालघर-१३५, गोंदिया-४७ व पुणे जिल्ह्यात २५ डॉक्टर कंत्राटी पद्धतीने घेतले जाणार आहेत. अनेक जिल्ह्यांत ही प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे.
जनतेला चांगली सेवा मिळेल
आरोग्य संवर्धिनी योजनेत कंत्राटी डॉक्टर नेमल्यामुळे उपकेंद्रांतही रुग्णांना चांगले उपचार मिळतील. शिवाय आहार-विहाराचे नियमित मार्गदर्शन मिळेल. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर येणारा ताणही यामुळे कमी होईल.
- डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली