गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 04:39 PM2023-03-15T16:39:27+5:302023-03-15T16:40:03+5:30

अर्थसंकल्पीय चर्चेअंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोनही प्रश्नांचे निराकरण केले.

135 crores to Gopinath Munde Sugar Cane Workers Welfare Corporation, Devendra Fadnavis announced | गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाने 135 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरादरम्यान केली आहे. 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याबाबत खंत व्यक्त केली होती. तसेच, मागील काही वर्षांपूर्वी भाजपचे सरकार सत्तेत असताना छत्रपती संभाजी नगर येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची केलेली घोषणा अपूर्ण असल्यावरून देखील धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. 

अर्थसंकल्पीय चर्चेअंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोनही प्रश्नांचे निराकरण केले. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला असून, प्रचलित नियमानुसार त्याच प्रमाणात कल्याण निधी संकलित केल्यास महामंडळाला एकूण 270 कोटी रुपये निधी मिळणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्या परवानग्या पूर्ण होताच स्मारक उभारणीचे काम सुरू केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 8 महिन्यांपासून ठप्प असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी देण्याच्या घोषणेचे धनंजय मुंडे यांनी स्वागत करत देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानले आहेत, त्याचबरोबर महामंडळ व स्मारकाच्या कामाला आता गती मिळावी, अशी अपेक्षाही धनंजय  मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 135 crores to Gopinath Munde Sugar Cane Workers Welfare Corporation, Devendra Fadnavis announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.