१३६ वर्ष जुना हॅंकॉक ब्रीज पाडण्यास सुरुवात, मुंबईत जम्बो मेगाब्लॉक,
By admin | Published: January 10, 2016 09:19 AM2016-01-10T09:19:27+5:302016-01-10T09:36:26+5:30
मध्य रेल्वे मार्गावर मशीदबंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेला १३६ वर्ष जुना हॅंकॉक पूल पाडण्याच्या कामाला शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मध्य रेल्वे मार्गावर मशीदबंदर रेल्वे स्थानकाजवळ असलेला १३६ वर्ष जुना हॅंकॉक पूल पाडण्याच्या कामाला शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या पूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल १८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत सीएसटी ते भायखळया दरम्यान रेल्वे वाहतूक बंद रहाणार आहे.
हा पूल तोडण्यासाठी मोठया प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे. जवळपास चारशे ते सहाशे कामगार आणि अधिकारी या कामात गुंतले आहेत.
रविवारी मध्ये रेल्वे मार्गावर लोकलसेवा फक्त भायखळयापर्यंत सुरु रहाणार आहे. काही गाडया फक्त ठाणे, कल्याण आणि दादरपर्यंत चालवण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दादर-भायखळया दरम्यान बेस्टने जादा गाडया रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
या जम्बो मेगाब्लॉकमुळे १०० हून अधिक लोकल आणि ४२ लांब पल्ल्याच्या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. भायखळा-सीएसटी लोकलसेवा बंद असली तरी, सीएसटीच्या दिशेने येणारी हार्बरसेवा सुरु आहे. त्यामुळे मध्यरेल्वेचे प्रवासी कुर्ल्याहून हार्बरमार्गे सीएसटीकडे येऊ शकतात.