विधिमंडळातील गोंधळात १४ विधेयके मंजूर; आम्हाला बोलू दिले नाही, विरोधकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:30 AM2018-11-28T06:30:01+5:302018-11-28T06:30:12+5:30
हिवाळी अधिवेशन : आरक्षणाच्या मागणीवरून जुंपली
मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळात गेल्या दोन दिवसात कोणत्याही चर्चेविना १४ विधेयके मंजूर झाली. शालेय शुल्कवाढी सारख्या महत्वाच्या विधेयकाचा यात समावेश आहे. आम्हाला या विधेयकांवर चर्चा करायची होती, पण सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालून विरोधकांना बोलू देत नाहीत. सरकारला कामकाज गुंडळण्याची घाई झाली आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
विधिमंडळात सोमवारी पाच आणि मंगळवारी ९ अशी एकूण १४ विधेयके मंजूर झाली. कामकाज रेटून नेण्याच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, कोणतीही चर्चा न होता १४ बिले मंजूर झाली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देखील विधेयकांवर चर्चा करायची होती. परंतु संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट सर्व बिले घ्या, असे सांगत होते. बापटांना एवढी काय घाई होती? सकाळी सभापतींच्या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे १ तास उशिरा आले. ज्येष्ठ मंत्र्यांना बाजूला सारुन मुख्यमंत्री राजकारण करत आहेत, असा आरोपही पवार यांनी केला.
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, याआधी ५१ अहवाल मांडले गेले नाहीत असे समर्थन मुख्यमंत्री करत असले तरी हा अहवाल विशिष्ट परिस्थितीत बनवला गेला. याआधी कोणतेही अहवाल सभागृहात मांडा, अशी मागणी झालेली नव्हती. धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलचा अहवाल सरकार मांडत नाही. मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देण्याचा अध्यादेश काढत नाही. अहवाल सभागृहात मांडण्यास मनाई असल्याचे तरी कायद्यात कुठे नमूद केले आहे, असा सवालही विखे पाटील यांनी केला.
न्यायालयात बोगस कागदपत्रांच्या आधारे १२५ आरोपींना जामीन
न्यायालयात १२५ पेक्षा अधिक आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन देऊन सुटका करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे येथे हे प्रकार घडले. भाजपाचे योगेश सागर यांनी या बाबत तारांकित प्रश्न विचारला होता. कल्याणला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आक्रस्ताळे!
विरोधकांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल विधानसभेत शांतपणे आपले मत मांडले होते. सकाळी सभापतींनी बोलावलेल्या बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली होती. मात्र सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पध्दतीने आक्रस्ताळेपणा करत भाषण केले. मुख्यमंत्र्यांना ते शोभणारे नव्हते, अशी टीका अजित पवार यांनी केली.