BREAKING: केतकीच्या अडचणीत वाढ, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; गोरेगाव पोलिसही कोर्टात पोहोचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:50 AM2022-05-18T11:50:57+5:302022-05-18T12:08:33+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ठाणे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महत्वाची बाब म्हणजे ठाण्याच्या सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले आहेत. गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कस्टडीची मागणी केली होती. न्यायालयाकडून कस्टडी देण्यात आली असून गोरेगाव पोलीस कोर्टाच्या आदेशाच्या प्रतीची वाट पाहात आहेत. तोवर केतकीला वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सध्या ठाण्यातील तुरुंगात नेण्यात आलं आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर गोरेगाव पोलीस केतकीचा ताबा घेणार आहेत.
केतकीची पोलीस कोठडी आज संपुष्टात आल्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं सर्व कागदपत्रं तपासली आणि तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेनं केतकीची कस्टडी मागितली आहे. केतकीचा मोबाइल आणि लॅपटॉप सायबर शाखेकडे तपासणीसाठी देण्यात आला असून त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल त्यामुळे तिच्या कोठडीत आणखी वाढ करुन देण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
केतकीनं वकील घेतला
केतकीनं याआधीच्या सुनावणीत कोणताही वकील घेतला नव्हता. तिनं स्वत:च न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. पण यावेळी तिनं वकील घेतला असून अॅड. घनश्याम उपाध्यय केतकीची बाजू कोर्टासमोर मांडत आहेत. त्यांनी केतकीच्या जामीनासाठी देखील अर्ज दाखल केला आहे.