जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर गुन्हा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:51 AM2017-11-15T02:51:05+5:302017-11-15T02:51:27+5:30
बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेळगाव : बेळगाव येथे प्रवेशबंदी आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह १४ जणांवर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन आमदारांसह १० जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी बेळगावातील वॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित केला होता. त्यासाठी महाराष्ट्रतील नेत्यांना प्रवेशबंदी होती. ती झुगारुन माजी मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील हे चौघेजण गनिमीकाव्याने बेळगावात आले. या सर्वांनी महामेळाव्यात सहभाग घेऊन सीमावासियांना महाराष्ट्रचा पाठिंबा जाहीर केला.
याप्रकरणी जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, बेळगावचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, नगरसेवक अनंत देशपांडे, बिदरचे रामभाऊ राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद केले असले तरी अद्याप आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची प्रतिक्रिया समिती नेत्यांनी दिली.